धाराशिव (प्रतिनिधी)-  जिल्ह्यात रस्ते अपघाताचे प्रमाण इतर जिल्ह्याच्या तुलनेत जास्त आहे. जिल्ह्यातील रस्ता अपघाताची सखोल कारणे शोधली पाहिजे.वाहन चालकांमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती करणे गरजेचे असून जिल्ह्यातील रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.असे निर्देश राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी दिले.

4 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्ह्यातील रस्ते अपघाताचा आढावा घेताना आयोजित सभेत भिमनवर बोलत होते. जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, पोलीस अधीक्षक रितू खोखर, प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर,उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शिवराम केत व एस.एस.मस्के, राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक स्वप्निल कासार व महेश पाटील, राष्ट्रीय महामार्ग उपप्रबंधक अमित पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.


रिफ्लेक्टर लावणे बंधनकारक

भिमनवार म्हणाले की, नेहमी अपघात होणारे ठिकाणे निश्चित करावे. मद्यपान करून वाहना चालवण्यावर कारवाई करावी. अपघातग्रस्त लोकांना तातडीने मदत करावी. दुचाकीस्वारांना हेल्मेटचा वापर करण्यास प्रवृत्त करावे असे सांगून भिमनवार म्हणाले की,जिल्ह्यात ऊस वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांना रिफ्लेक्टर लावणे बंधनकारक करावे. तसेच दुचाकी वाहनांना देखील रिफ्लेक्टर लावावे.त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होईल.रस्त्याचे व पुलाचे जिथे काम सुरू आहे,त्या ठिकाणी रिफ्लेक्टर व बॅरिकेट्स लावण्यात यावे तसेच काम सुरू असलेल्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात यावे. त्यामुळे कामाच्या ठिकाणी होणारे अपघात टाळता येतील. 


328 जणांचा मृत्यू

प्रादेशिक परिवहन अधिकारी चव्हाण म्हणाले की,जिल्ह्यात जानेवारी 2025 ते आतापर्यंत झालेल्या रस्त्या अपघाताची नोंद घेऊन रस्ता अपघाताची कारणे शोधली आहेत. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी डाके यांनी जिल्ह्यात रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.  जिल्ह्यात जानेवारी 2024 ते  ऑक्टोबर 2024 पर्यंत 227 रस्ते अपघातात 250 व्यक्तींचा आणि जानेवारी सन 2025 ते ऑक्टोबर 2025 पर्यंत 302 रस्ते अपघातात 328 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती डाके यांनी यावेळी दिली.

 
Top