धाराशिव (प्रतिनिधी)- एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचे आयुष्मान कार्ड काढण्यासाठी लाभार्थ्यांची ई-केवायसी करण्याकरीता जिल्ह्यात विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.
आयुष्मान भारतप्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत जिल्ह्यात सध्या 15.23 लक्ष लाभार्थी असून त्यापैकी 6.80 लक्ष लाभार्थ्यांचे आयुष्मान कार्ड ई-केवायसी झालेले आहे.उर्वरित लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी आशा कर्मचारी, स्वस्त धान्य दुकान चालक व आपले सरकार सेवा केंद्रातील कर्मचारी यांना प्रती यशस्वी ई-केवायसीसाठी 20 रुपये व आयुष्मान कार्ड वितरणासाठी 10 रुपये,असे एकूण 30 रुपये मानधन स्वरूपात देण्याबाबत शासन निर्णय पारित झाला आहे.
या योजनेअंतर्गत प्रति कुटुंब प्रति वर्ष 5 लाख रुपयांपर्यंत मोफत शस्त्रक्रिया व उपचाराची सुविधा 1356 आजारांवर उपलब्ध आहे.हा लाभ धाराशिव जिल्ह्यातील 27 खाजगी व 13 शासकीय अशा एकूण 40 रुग्णालयांमध्ये तसेच महाराष्ट्रातील सुमारे 2300 शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये घेता येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील लाभार्थ्यांना ग्रामपंचायत स्तरावर आपले सरकार सेवा केंद्र, केंद्र,आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचारी यांच्या मार्फत मोफत आयुष्मान कार्ड काढून देण्यात येणार आहे.जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा, तसेच 70 वर्षे व त्यावरील जेष्ठ नागरिकांनी आयुष्मान वय वंदना कार्ड काढून घ्यावे,असे आवाहन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष यांनी केले आहे.