धाराशिव (प्रतिनिधी)-  धाराशिव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 ची मतमोजणी उद्या (दि.21) सकाळी 10 वाजेपासून कै. भाई उद्धवराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था  येथे होणार आहे. या मतमोजणी प्रक्रियेसाठी निवडणूक प्रशासनाने सविस्तर नियोजन केले असून सर्व प्रक्रिया पारदर्शक व शिस्तबद्ध पद्धतीने राबविण्यात येणार आहे.

मतमोजणी करताना प्रथमतः टपाली मतमोजणी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्यापूर्वी सकाळी नऊ वाजता उमेदवार व त्यांच्या मतमोजणी प्रतिनिधींच्या उपस्थितीत टपाली मतपत्रिका पेट्या उघडून मतपत्रिकांचे वर्गीकरण करतील. त्यानंतर सकाळी 10 वाजता टपाली मतपत्रिकांची मतमोजणी व मतदान यंत्रातील (ईव्हीएम) मतमोजणी एकाच वेळी सुरू करण्यात येणार आहे. मतदान यंत्रातील मतमोजणी ही प्रभागनिहाय केली जाणार असून एकूण 20 प्रभागांसाठी 20 स्वतंत्र मतमोजणी टेबलांची रांग लावण्यात येणार आहे. प्रत्येक मतमोजणी टेबलवर 1 मतमोजणी पर्यवेक्षक, 2 मतमोजणी सहाय्यक आणि 1 वर्ग-4 कर्मचारी अशी चार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. याशिवाय संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी एकूण 5 रिटर्निंग ऑफिसर (आर.ओ.) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणी सुरू होण्यापूर्वी सर्व मतमोजणी टेबलवरील नियुक्त शिपाई कर्मचारी एका रांगेत स्ट्राँग रूमकडे जातील. शिपाई कर्मचाऱ्यांना पुरविण्यात आलेल्या ओळखपत्रावर (बॅच) संबंधित टेबलचा अनुक्रमांक नमूद केलेला असणार आहे.

त्यानुसार प्रभागनिहाय व टेबलनिहाय मतदान यंत्रे त्यांच्याकडे सुपूर्द केली जातील. ही मतदान यंत्रे तसेच मतमोजणीसाठी लागणारे अन्य साहित्य कर्मचारी संबंधित टेबलवरील मतमोजणी पर्यवेक्षकाकडे आणून देतील. यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून मतमोजणी सुरू करण्याबाबत अधिकृत उद्घोषणा करण्यात येईल. उद्घोषणेनंतर प्रत्येक टेबलवरील मतमोजणी पर्यवेक्षक उमेदवारांच्या अधिकृत मतमोजणी प्रतिनिधींच्या उपस्थितीत मतमोजणी प्रक्रिया सुरू करतील. प्रभाग क्रमांक 1 ते 20 मधील प्रभागनिहाय मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर त्या-त्या प्रभागातील नगरसेवकांचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. सर्व 20 प्रभागांची मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच नगराध्यक्षपदाचा अंतिम निकाल घोषित केला जाणार आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पदाचा निकाल लागण्यास उशीर होणार आहे. नगराध्यक्षाचा निकाल उशिरा जाहीर होणार असल्यामुळे नगरसेवक पदासाठी निवडून येणाऱ्या सदस्यांना जल्लोष करण्यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे. मतमोजणीच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात येणार आहे. मतमोजणी केंद्रावर आणि बाहेरही पोलिसांची सुरक्षा असणार आहे. धाराशिव नगरपालिकेच्या नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाचा निकाल दुपारी लवकर लागण्याची शक्यता आहे


 
Top