धाराशिव (प्रतिनिधी)-  प्रसिद्धी पासून दूर राहून अनेकजण समाजाची निरपेक्षपणे सेवा करतात. मानव सेवा हीच ईश्वर सेवा समजून केलेले त्यांचे कार्य खरोखरच पुरस्कारास पात्र आहे. पुरस्कार मिळालेल्यांचे हे कार्य समाजातील सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले. भारतरत्न माजी पंतप्रधान श्रद्धेय कै. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनानिमित्त लोकसेवा समिती, धाराशिव यांचे वतीने देण्यात येणारा मराठवाडा स्तरीय  लोकसेवा पुरस्कार-2025  च्या वितरण कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकसेवा समितीचे उपाध्यक्ष डॉ. अभय शहापूरकर होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष, लोकसेवा समितीचे सचिव कमलाकर पाटील, सदस्य शेषाद्री डांगे, ऍड. मुकुंद पाटील, अनघा मुकुंद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. पुरस्काराचे हे 16 वे वर्ष आहे. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेचे पूजन करुन दीप प्रज्वलनाने झाली. पुढे बोलताना जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार म्हणाले की, गेल्या 16 वर्षांपासून लोकसेवा समिती करत असलेले कार्य प्रशंसनीय आहे. समाजातील लोकांचा सहभाग घेऊन लोकसेवा समितीच्या वतीने समाजात अमूल्य सेवा देणाऱ्या सेवावृत्तींचा सत्कार दरवर्षी केला जातो. ही अभिमानास्पद बाब असल्याचे जिल्हाधिकारी पुजार यांनी सांगितले.

यावेळी बोलताना शेषाद्री डांगे, ऍड. मुकुंद पाटील यांचेही भाषण झाले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते चंद्रशेखर बाबुराव पाटील यांना पालावरची शाळा याबद्दल तर प्रसाद मधुकरराव चिक्षे जल सहयोग चळवळीबद्दल तर  गंगाधर खेडकर लातूर, मातोश्री वृद्धाश्रम उत्कृष्टरित्या चालविल्याबद्दल या तीन पुरस्कारार्थींना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम 11 हजार रुपये, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व बुके देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषण डॉ. शहापूरकर यांचे झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना लोकसेवा समितीचे सचिव कमलाकर पाटील यांनी केली. सत्कारमूर्तींच्या सन्मानपत्रांचे वाचन बालाजी माळी, प्रा. अशोक गोरे व संदिपान गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रशांत गुरव यांनी केले. तर डॉ. मनिष देशपांडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. 

 
Top