वाशी :- येथील शिवाजी ज्ञान विहार शिक्षण मंडळ, वाशी संचलित अंकुरम विद्यामंदिर शाळेमध्ये 22 डिसेंबर रोजी महान भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय गणित दिन अत्यंत उत्साहात व शैक्षणिक वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून करण्यात आली.

राष्ट्रीय गणित दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये गणिताविषयी गोडी निर्माण व्हावी, त्यांची तर्कशक्ती व विश्लेषण क्षमता वाढावी या उद्देशाने शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गणित प्रश्नमंजुषा, गणितीय कोडी, मेंदूला चालना देणारे गणितीय खेळ, विविध गणिती सूत्रांची माहिती तसेच दैनंदिन जीवनात गणिताचा होणारा उपयोग यावर आधारित उपक्रमांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी आकृत्या, चार्ट, मॉडेल्स व प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विविध गणितीय संकल्पनांचे प्रभावी सादरीकरण करून आपली गणिती प्रतिभा सादर केली.

गणित दिन साजरा करण्यामागील शाळेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमधील गणिताची भीती दूर करणे, गणिताविषयी सकारात्मक व आनंददायी दृष्टिकोन निर्माण करणे, तसेच गणिताचा व्यवहारातील उपयोग समजावून देणे हा होता. यासोबतच विद्यार्थ्यांची तर्कशक्ती, विचारशक्ती व समस्या सोडविण्याची क्षमता विकसित व्हावी आणि महान गणितज्ञांच्या कार्यातून प्रेरणा मिळावी, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना गणिताकडे भीतीने न पाहता आनंदाने व आत्मविश्वासाने पाहण्याचे आवाहन केले. गणित हा केवळ अभ्यासक्रमातील विषय नसून जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेले महत्त्वाचे कौशल्य असल्याचे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गणित विषयाचे शिक्षक दिनेश अतकरे, प्रतीक्षा गपाट तसेच इतर सर्व शिक्षकवृंदांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे संचालक राजेश आवटे यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले. राष्ट्रीय गणित दिनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये गणिताविषयी आवड, जिज्ञासा व आत्मविश्वास निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.


 
Top