धाराशिव (प्रतिनिधी)-  धाराशिव नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत भाजपच्या नेहा राहुल काकडे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. अंतिम म्हणजेच नवव्या फेरीअखेर नेहा काकडे यांना एकूण 21 हजार मते मिळाली. त्यांच्या प्रमुख प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या परवीन खलिफा कुरेशी यांना 18 हजार 532 मते मिळाली. तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या संगीता सोमनाथ गुरव यांना 14 हजार 486 मते मिळाली.

अंतिम निकालानुसार नेहा काकडे यांनी परवीन कुरेशी यांच्यावर 2 हजार 468 मतांची स्पष्ट आघाडी घेत विजय निश्चित केला. तसेच शिवसेना उबाठा गटाच्या उमेदवार संगीता गुरव यांच्यापेक्षा काकडे यांनी तब्बल 6 हजार 514 मते अधिक घेतली. शेवटच्या फेरीची मतमोजणी पूर्ण होताच भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या उमेदवाराने शिवसेना (उबाठा) गटाच्या उमेदवाराला मोठा फटका दिला. संपूर्ण प्रचारात जोरदार लढत अपेक्षित असतानाही शिवसेना उबाठा गटाचा उमेदवार तिसऱ्या स्थानावर फेकला गेला. यामुळे स्थानिक राजकारणात समीकरणे बदलत असल्याचे चित्र दिसून आले. नगरसेवक निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा पटकावत आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली. विशेष म्हणजे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नाही. धाराशिव नगर परिषदेमध्ये भाजप 22, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस 8, शिवसेना उबाठा गट 7, काँग्रेस 3, एमआयएम 1 असे एकूण 41 नगरसेवक निवडून आले आहेत.



पहिल्या फेरीपासून आघाडी 

धाराशिव नगरपरिषद निवडणुकीची मतमोजणी भाई उध्दवराव पाटील आद्योगिक प्रशिक्षण केंद्र येथे सकाळी 10 वाजता सुरू झाली. पोस्टल मतमोजणी 11 वाजेपर्यंत चालली. त्यानंतर ईव्हीएम मशीनची मतमोजणी सुरू झाली. पहिल्या फेरीपासून नेहा काकडे या आघाडीवर राहिल्या आहेत. एकूण 9 फेऱ्या झाला. सातव्या फेरी अखेर भाजपच्या नेहा काकडे यांना 20648 मते, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या परवीन कुरेशी यांना 18152 मते तर शिवसेना उबाठा गटाच्या संगिता गुरव यांना 14207 मते मिळाली होती. नवव्या फेरी अखेर नेहा काकडे यांना 21 हजार मते मिळाली. तर परवीन खलिफा कुरेशी यांना 18 हजार 532 मते मिळाली. तर शिवसेना (उबाठा) गटाच्या संगीता सोमनाथ गुरव यांना 14 हजार 486 मते मिळाली.





 
Top