धाराशिव (प्रतिनिधी)- नगरपालिकांच्या निवडणुकीत धाराशिव जिल्ह्यातील जनतेने स्पष्टपणे सत्ताधारी आघाडीच्या बाजूने कौल दिला आहे. जिल्ह्यातील आठ नगरपालिकांपैकी चार नगरपालिकेमध्ये शिंदे यांची शिवसेना तर इतर चार नगरपालिकेत भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. त्यामुळे सत्ताधारी पक्षाचे वर्चस्व धाराशिव जिल्ह्यात स्पष्ट झाले आहे.
धाराशिव तुळजापूर, नळदुर्ग आणि मुरुम या नगरपालिकांवर भारतीय जनता पार्टीने दणदणीत विजय मिळवला आहे. धाराशिव मध्ये नेहा राहुल काकडे तर तुळजापूरमध्ये विनोद गंगणे, नळदुर्गमध्ये बसवराज धरणे तर मुरुममध्ये बापुराव पाटील विजयी झाले आहेत. उमरगा नगरपालिकेत शिवसेनेने सत्ता हस्तगत करत किरण गायकवाड यांनी तब्बल 5900 मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे. कळंब येथे शिवसेनेच्या सुनंदा कापसे यांनी बाजी मारली असून, परांडा येथे शिवसेनेचे उमेदवार जाकीर सौदागर यांनी निसटत्या फरकाने विजय मिळवला आहे. भूम नगरपालिकेत अटीतटीचा सामना होवून शिवसेनेच्या संयोगिता गाढवे या विजयी झाल्या आहेत.
ढिसाळ कारभार
धाराशिवमध्ये मिडिया कक्षाची मतमोजणी केंद्रापासून दूर एका मंडपामध्ये व्यवस्था करण्यात आली. पाण्याचीही व्यवस्था नसल्याने पत्रकारांच्या तक्रारीनंतर व्यवस्था करण्यात आली. विशेष म्हणजे या मिडिया कक्षामध्ये अपुऱ्या खुर्च्या अभावी काही पत्रकार मंडपाच्या बाहेर उभा राहिले. त्यानंतर 11.30 वाजण्याच्या दरम्यान खुर्च्या मागविण्यात आल्या. जिल्हा माहिती अधिकारी हे मतमोजणी केंद्रात जात असताना पोलिसांनी त्यांना गेटवर आढवले. पत्रकारांनी ते जिल्हा माहिती अधिकारी आहेत असे सांगून सुध्दा त्यांना मध्ये सोडले नव्हते. अखेर मतमोजणी केंद्रातून लाऊड स्पिकरद्वारे त्यांना आत सोडण्याची सुचना करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार देशमुख यांनी स्वतः गेटवर येवून जिल्हा माहिती अधिकारी यांना आत घेवून गेले.


