तुळजापूर (प्रतिनिधी)- राज्यात सर्वाधिक चर्चेत असलेल्या तीर्थक्षेत्र तुळजापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार विनोद गंगणे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अमर मगर यांचा 1686 मतांनी पराभव करत नगराध्यक्षपदावर दणदणीत विजय मिळवला आहे.
23 नगरसेवकांच्या जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत भाजपने 18 जागांवर, तर महाविकास आघाडीने 5 जागांवर विजय मिळवला. यामुळे तुळजापूर नगरपरिषदेवर पहिल्यांदाच भाजपची स्वबळावर सत्ता स्थापन झाली आहे. यापूर्वी भाजपची सत्ता जरी होती, तरी ती इतर पक्षांतून आलेल्या नगरसेवकांच्या पाठिंब्यावर होती.
या निवडणुकीत भाजपचे दोन माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर आणि सचिन रोज करी यांना पराभव स्वीकारावा लागला. विशेष म्हणजे काँग्रेसचे आनंद जगताप यांनी सचिन रोचकरी यांचा पराभव केला. तर माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर यांचा पराभव त्यांच्या पुतण्यानेच अक्षय परमेश्वर यांनी केला. हे दोन्ही पराभव भाजपसाठी धक्कादायक ठरले.
विजयानंतर बोलताना नगराध्यक्षपदाचे नवनिर्वाचित उमेदवार विनोद गंगणे म्हणाले, “आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या धोरणाला मतदारांनी तोरण बांधले आहे. आता तीर्थक्षेत्र विकासाचा रथ अखंडपणे सुरू राहील.”आपल्याविरोधातील आरोपांवर बोलताना त्यांनी विरोधकांवर टीका करत, “लोकांच्या मनात मीच होतो. मी काय केलंय ते जिल्ह्याला माहिती आहे,” असे सांगितले. विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी कुंकवाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. विजयी मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आल्यानंतर येथे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते विनोद गंगणे यांचा सत्कार करण्यात आला.
भाजपकडून विजयी झालेले उमेदवार
देशमाने मंजुषा, प्रसाद पंडित, देवीचंद जगदाळे, औदुंबर कदम, पंडितराव क्षीरसागर, नीता दिनेश कदम, अनुजा अजित पेंदे, लखन भालचंद्र साठे, महानंदाबाई किशोर भोसले, चंद्रशेखर बाळासाहेब भोसले, जयश्री विजयकुमार कंदले, अश्विनी विशाल रोचकरी, मलकु नाईक, प्रिया मनोज रोचकरी, रामचंद्र सुखदेव आदी भाजप उमेदवार विजयी झाले.
महाविकास आघाडीकडून विजयी झालेले उमेदवार
प्रगती गोपाळ लोंढे, रणजीत चंद्रकांत इंगळे, अमोल माधवराव कुतवळ, अक्षय परमेश्वर या निवडणुकीत भाजपचे तालुकाध्यक्ष आनंद कंदले यांच्या चुलती माजी नगराध्यक्ष जयश्री कंदले या अवघ्या 10 मतांनी विजयी झाल्या, हा निकाल विशेष ठरला. या निवडणुकीत सर्वाधिक चुरस प्रभाग 8 मध्ये झाली. येथे क्रॉस वोटिंग झाली.
