तुळजापूर (प्रतिनिधी)- शेतजमिनीच्या डिजिटल सातबारा, आठ-अ तसेच फेरफार नोंदी ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देत महसूल विभागाने डिजिटल क्रांतीकडे महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. मात्र ही यंत्रणा गेल्या काही दिवसांपासून व्यवस्थित कार्यरत नसल्याने तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

महसूल विभागाने डिजिटल सातबारा, आठ-अ आणि फेरफार उताऱ्यांना कायदेशीर मान्यता दिली आहे. त्यामुळे तलाठ्याच्या सहीविनाही हे उतारे अधिकृत मानले जात असून शासकीय, निमशासकीय कार्यालये, बँका, कर्जप्रक्रिया, न्यायालयीन कामकाजासाठी ते वैध आहेत. शेतकऱ्यांसाठी सातबारा हा अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज असून कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी त्याची आवश्यकता असते. मात्र मागील दोन दिवसांपासून ऑनलाइन सर्वर सतत बंद पडत आहे. काही वेळ सुरू होतो, पण सातबारा डाउनलोड करण्याच्या टप्प्यावर प्रणाली बंद पडते. परिणामी उतारा मिळत नाही, पण नागरिकांच्या खात्यातून पैसे मात्र कट होतात. यामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

सातबारा, आठ-अ, फेरफार उतारे, जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला अशा अनेक शासकीय ऑनलाइन कागदपत्रांसाठी नागरिकांना या प्रणालीवर अवलंबून राहावे लागते. मात्र ही व्यवस्था वारंवार ठप्प होत असल्याने जमीन खरेदी-विक्री व्यवहार, बँक कर्ज प्रकरणे, शासकीय योजनांचे अर्ज तसेच इतर महत्त्वाची कामे रखडली आहेत. डिजिटल सुविधा हा शासनाचा अत्यंत स्तुत्य उपक्रम असला तरी त्यासाठी सक्षम सर्वर, तांत्रिक देखभाल आणि तत्काळ दुरुस्ती व्यवस्था असणे आवश्यक आहे. अन्यथा ही सुविधा शेतकऱ्यांसाठी सोयीऐवजी डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. ऑनलाइन सेवा सुरळीत सुरू न झाल्यास नागरिकांना पुन्हा तालुका कार्यालये, सेतू केंद्रे व सायबर कॅफेंच्या फेऱ्या माराव्या लागत असून वेळ व पैशांचा अपव्यय होत आहे. शासनाने तातडीने लक्ष घालून डिजिटल सातबारा व सर्व ऑनलाइन सेवा सक्षम कराव्यात, तसेच पैसे कट होऊनही उतारे न मिळालेल्यांना परतावा द्यावा,” अशी जोरदार मागणी शेतकरी व नागरिकांकडून होत आहे.

 
Top