धाराशिव (प्रतिनिधी)- मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने एक हात मदतीचा उपक्रमांतर्गत धाराशिव येथे मोफत जिल्हास्तरीय (बिगरहुंडा) सामुदायिक विवाह सोहळ्याचे रविवार, दि. 8 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजन करण्यात आले आहे. शहरातील जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या मैदानावर सायंकाळी 6.25 वाजता हा सोहळा होणार असून इच्छुक वधु-वराच्या पालकांनी 15 जानेवारी 2026 पर्यंत नावनोंदणी करावी, असे समितीचे अध्यक्ष आकाश मिलिंदराव कोकाटे यांनी कळविले आहे.
राज्याचे माजी मंत्री तथा परंडा-भूम-वाशी मतदारसंघाचे आमदार प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या सौजन्याने हा विवाह सोहळा पार पडत आहे. सामुदायिक विवाह सोहळ्यात वधु-वरांना मणी मंगळसूत्र, जोडवे, दिवाण, वधु-वरांचे वस्त्र, रूकवत देण्यात येणार असून वऱ्हाडी मंडळींच्या भोजनाचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे. विवाह नोंदणीसाठी बालविवाह प्रतिबंधक कायदा व हुंडा प्रतिबंधक कायद्यांतर्गत असलेल्या कोणत्याही कलमाचा भंग दांपत्य अथवा कुटुंबीयांकडून झालेला नसावा. त्यासाठी विहित नमुन्यातील प्रतिज्ञापत्र स्टॅम्प पेपरवर सादर करणे आवश्यक आहे. जन्म तारखेचा पुरावा म्हणून जन्म नोंदणी प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याच्या दाखल्याची प्रत किंवा जन्माचा स्थानिक प्राधिकाऱ्याने दिलेला दाखला किंवा वैद्यकीय अधिकाऱ्याचे वयाबाबतचे प्रमाणपत्र बंधनकारक आहे. अर्जासोबत वधु-वराचा फोटो सादर करावा.
नोंदणीसाठी बळवंत घोगरे (942334342042), सुधीर देशमुख (9403696589), बालाजी झेंडे (9284265142), महेश राऊत (7498294005 / 8007134444) यांच्याशी तसेच अधिक माहितीसाठी हॉटेल रोमा पॅलेस महावितरण कार्यालयासमोर धाराशिव येथे संपर्क साधावा. जास्तीत जास्त गरजू व इच्छुक वधु-वरांच्या पालकांनी सामुदायिक विवाह सोहळ्याचा लाभ घ्यावा. असेही मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष आकाश कोकाटे यांनी कळविले आहे.
