धाराशिव (प्रतिनिधी)- देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला शुक्रवार दि. 5 डिसेंबर रोजी 1 वर्षे पूर्ण झाले आहे. वर्षभरात धाराशिव जिल्ह्याला रेल्वे, तिर्थक्षेत्र विकास, मेडिकल कॉलेज, सिंचन योजना आदीसाठी करोडो रूपयांच्या निधीस सरकारने मंजूरी देवून उपलब्ध करून दिला जात आहे. अशी माहिती भापजचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शुक्रवार दि. 5 डिसेंबर रोजी सायंकाळी झालेल्या या पत्रकार परिषदेस ॲड. नितीन भोसले, दत्ता देवळकर उपस्थित होते. पुढे माहिती देताना दत्ता कुलकर्णी यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून लोकपयोगी योजना अंमलात आणल्या. वर्षभरात धाराशिव जिल्ह्याला फडणवीस सरकारकडून योजनेचा फार मोठा लाभ मिळाला आहे. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पास 11 हजार 700 कोटी रूपये मिळाले. धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारचा 50 टक्के वाटा 3295 कोटी रूपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता दिली आहे. तर वैद्यंकीय महाविद्यालय उभारणीसाठी 31 एकर जमीन संपादन करून इमारतीसाठी 430 कोटी रूपये मंजूर केले आहेत. महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी मंदिर विकास कामासाठी 1865 कोटी रूपयांच्या निधीस मान्यता दिली आहे. तिर्थक्षेत्र अंतर्गत तुळजापूर शहराच्या व मंदिराच्या विकासासाठी भूसंपादन करण्यासाठी 500 कोटीपेक्षा जास्त निधीची तरतूद करण्यात आली आहे. टेक्निकल टेकस्टाईल पार्कसाठी पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी 24 कोटी रूपयांचे काम चालू आहे. धाराशिव शहर व ग्रामीण भागातील लोकांना आरोग्याच्या अत्याधुनिक सुविधा मिळण्यासाठी 500 बेडचे रूग्णालय उभारणीसाठी 230 कोटी रूपये मंजूर केले आहेत. आयुवैधिक रूग्णालयातील शस्त्रक्रिया विभागासाठी 39 कोटी 50 लाख रूपये मंजूर केले आहेत. अतिवृष्टीत नुकसान झालेल्यांना 1278 कोटी रूपयांची मदर करण्यात आली आहे. या प्रमाणेच गेल्या अनेक वर्षापासून दुरूस्ती अभावी बंद पडलेल्या तेरणा उपसा सिंचन योजना, करनुर योजनेसाठी 142 कोटी 65 लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याप्रमाणे अनेक विकास योजनेसाठी धाराशिव जिल्ह्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार सुजितसिंग ठाकूर यांच्यामुळे जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात निधी मिळाला. असे दत्ता कुलकर्णी यांनी सांगितले.
