वाशी (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील वाशी पोलीस स्टेशनच्या पथकाने 4 डिसेंबर रोजी राष्ट्रीय महामार्गावर मोठी कारवाई करत चोरीची मोटरसायकल घेऊन फिरणारे दोन आरोपी राहुल रामचंद्र काळे आणि बाळू रामचंद्र काळे दोघेही रा. रामेश्वर, ता. केज, जि. बीड या दोघांना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे महामार्गावरील चोरीच्या घटनांना मोठा आळा बसला असून पोलिसांच्या दक्षतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
वाशी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकरराव शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गुन्हेगारीवर कडक नियंत्रण आणले असून, परिसरातील चोरट्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखालील पथक 4 डिसेंबर रोजी राष्ट्रीय महामार्गावर नियमित गस्त घालत असताना एका दुचाकीवर दोन संशयास्पद व्यक्ती दिसल्या. या दोघांनी स्वतःची व वाहनाची ओळख लपवण्याचा प्रयत्न केल्याने पथकाला गंभीर संशय आला.
पोलिसांनी तत्काळ त्यांच्या मागावर जात बारलोणी पेढी परिसरात दोघांना थांबवून चौकशी केली. तपासात त्यांच्या जवळील दुचाकीचा क्रमांक एमएच-45 एएम 4132 असून ती पोलीस स्टेशन कुर्डूवाडी, ता. माढा, जि. सोलापूर येथून चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे दोघांना चोरीच्या वाहनासह ताब्यात घेण्यात आले. संपूर्ण कारवाई पोलीस निरीक्षक शंकरराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात पोहेकॉ. कपिल बोरकर, पोकॉ. नसीर हुसेन सय्यद, पोकॉ. विनोद वारे, पोकॉ. रामा शेळके, पोकॉ. गोपीनाथ पवार या सर्वांनी संयुक्तपणे ही यशस्वी कारवाई पार पाडली. या प्रकरणी पुढील तपास वाशी पोलीस स्टेशनकडून सुरू असून, महामार्गावरून जाणाऱ्या नागरिकांमध्ये या कारवाईमुळे मोठा दिलासा निर्माण झाला आहे.
