धाराशिव (प्रतिनिधी)- राज्यात शेतकऱ्यांकडून उत्पादन क्षमतेत वाढ करण्यासाठी विविध प्रयोगशील पद्धती अवलंबल्या जातात.शेतकऱ्यांच्या अशा नवनवीन प्रयोगांना प्रोत्साहन देणे,त्यांच्या मनोबलात वाढ करणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अधिक जोमाने व्हावा,यासाठी राज्यात पिकस्पर्धा योजना राबविली जाते.या उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होते,तसेच त्यांचा अनुभव इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरतो.त्यामुळे राज्याच्या एकूण कृषी उत्पादनात मोलाची भर पडते.
पिकस्पर्धा-2020 दि.20 जुलै 2023 अन्वये रब्बी हंगाम 2025 साठीही मागील वर्षाप्रमाणे तालुका,जिल्हा व राज्य पातळीवर पिकस्पर्धा राबविण्यात येणार आहे.कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम 2024 मध्ये ज्वारी,गहू,हरभरा,करडई व जवस या पाच पिकांसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
स्पर्धेतील पिके : ज्वारी,गहू,हरभरा करडई,जवस (एकूण 5 पिके)
पात्रता निकष : शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर जमीन असणे आणि ती तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे.शेतकऱ्याला एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभागी होता येईल.स्पर्धेत सहभागी होणाऱ्या पिकाखाली किमान 40 आर सलग लागवड क्षेत्र असणे आवश्यक.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे :
विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ),प्रवेश शुल्क भरल्याचे चलन,7/12 व 8-अ उतारे,जात प्रमाणपत्र (आदिवासी गटासाठी),घोषित क्षेत्राचा चिन्हांकित नकाशा.अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ही ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस : 31 डिसेंबर 2025 आहे.
तालुका,जिल्हा आणि राज्य पातळीवर पीकनिहाय विजेते प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकानुसार निवडले जातील.प्रवेश शुल्क हे सर्वसाधारण गट 300 रुपये, आदिवासी गट 150 रुपये आहे.बक्षिसे (सर्वसाधारण व आदिवासी गट).तालुकास्तर, जिल्हास्तर व राज्यस्तरावरील पिक स्पर्धा निकाल प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पीक स्पर्धा विजेते निवडण्यात येतील.राज्य पातळी : पहिले 50,000 रुपये, दुसरे 40,000 रुपये,तिसरे 30,000 हजार रुपये, जिल्हा पातळी पहिले : 10,000 रुपये, दुसरे 7,000 रुपये आणि तिसरे 5,000 रुपये. तालुका पातळी पहिले : 5,000 रुपये, दुसरे 3,000 रुपये आणि तिसरे 2,000 रुपये असे सर्वसाधारण व आदिवासी गट बक्षिसे देण्यात येतील.
शेतकऱ्यांनी या स्पर्धेत उत्साहाने सहभागी व्हावे,आपल्या क्षेत्रात व उत्पादनात वाढ करून राज्याच्या कृषी विकासात योगदान द्यावे,असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा तसेच www.krishi.maharashtra.gov.in <http://www.krishi.maharashtra.gov.in/> या संकेतस्थळाला भेट द्यावी.