भूम (प्रतिनिधी)- शहरात दिवसाढवळ्या जबरी घरफोडीची घटना घडली असून, चोरट्यांनी सोने-चांदी असा मिळून लाखो रूपयांचा ऐवज लंपास केला आहे. ही घटना शुक्रवारी दि.19 डिसेंबर रोजी दुपारी सव्वा एकाच्या सुमारास शिवाजीनगर येथील दिनेश सोमनाथ डोके यांच्या घरी घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिवाजीनगर येथे डोके यांचे घर असून, कुटुंबातील काही सदस्य बाहेरगावी होते. दरम्यान, रतन डोके या शेजारच्या गल्लीत काही कामानिमित्त गेल्या होत्या. सुमारे अर्ध्या तासाने त्या घरी परतल्या असता घराचे कुलूप खाली पडलेले दिसले. त्याचवेळी घरातून दोन अज्ञात इसम बाहेर पडताना दिसले. रतन डोके यांनी आरडाओरड केली. चोरट्यांनी कपाटातील सोन्याचे दागिने व चांदीची भांडी चोरून नेली आहेत. भूम पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गणेश कानगुडे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला.
