धाराशिव (प्रतिनिधी)- समाजातील सेवाभावी उपक्रमांना सातत्याने बळ देणारी रोटरी सेवा ट्रस्ट, धाराशिव ही संस्था सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवत विविध सेवाभावी संस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहत आहे. याच परंपरेत अन्नपूर्णा संस्थेच्या 10 व्या वर्धापन दिनानिमित्त रोटरी सेवा ट्रस्ट व रोटरी क्लब धाराशिव यांच्या वतीने 51 हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.
सन 2015 मध्ये सुरू झालेली अन्नपूर्णा संस्थेची अन्नदान सेवा आज दहा वर्षांचा टप्पा पूर्ण करत असून, या कालावधीत सुमारे 15 लाख गरजूंनी भोजनाचा लाभ घेतला आहे. विशेषतः सिव्हिल हॉस्पिटल, धाराशिव येथील रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांसाठी दररोज 300 ते 400 जणांना अन्नदान करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ही संस्था करीत आहे. अन्नदानाबरोबरच रक्तदान, स्वर्गरथ सेवा, गोशाळा अशा विविध सामाजिक उपक्रमांनाही अन्नपूर्णा संस्था चालना देत असून, कोरोना महामारीसारख्या कठीण काळातही संस्थेने उत्तम कार्य केले आहे. धनादेश प्रदान करताना रोटरी अध्यक्ष रो. रणजित रणदिवे, सचिव रो. प्रदीप खामकर, रोटरी सेवा ट्रस्टचे सचिव पी. आर. काळे, रो. प्रदिप मुंडे, रो. सुनील गर्जे व रो. कुणाल गांधी उपस्थित होते.
रोटरी सेवा ट्रस्ट धाराशिव ही संस्था समाजातील गरजू घटकांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांना आर्थिक, नैतिक व सामाजिक पाठबळ देत असून, “सेवा हाच खरा धर्म” या भावनेतून लोकहिताचे उपक्रम सातत्याने राबवत आहे. अन्नपूर्णा संस्थेसारख्या सेवाभावी उपक्रमांना दिलेले सहकार्य हे रोटरी सेवा ट्रस्टच्या सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
