उमरगा (प्रतिनिधी)- मुरुम नगरपालिका निवडणुकीत मागील 50 वर्षांपासूनची परंपरा कायम राखत पाटील परीवाराने नगरपालिकेवर एकहाती सत्ता राखली आहे. माजी मंत्री बसवराज पाटील यांचे बंधू भारतीय जनता पक्षाचे उमेदवार बापुराव पाटील नगराध्यक्ष पदावर विजयी झाले आहेत. तर 20 पैकी 19 जागांवर भाजपाचे नगरसेवक विजयी झाले आहेत. तर शिवसेना (ठाकरे) चा एक नगरसेवक विजयी झाला आहे. काँग्रेस, शिवसेना (शिंदे), दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे.
मुरुम नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या विरोधात सर्वपक्षीयांनी गळ्यात गळे घालून निवडणूक लढवली. दोन्ही शिवसेनेच्या चिन्हावर अधिकृत उमेदवार असताना शिंदे सेनेने ठाकरे सेनेला पाठिंबा दिला. खासदार ओमराजे निंबाळकर व शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या सभा घेऊनही शहरवासीयांनी भारतीय जनता पक्षाने विकासाच्या मुद्यावर मोठा विजय मिळवला आहे. भाजपाचे 19 नगरसेवक निवडून आले आहेत. शिवसेना (ठाकरे) ने एका जागेसह नगरपालिकेत चंचुप्रवेश केला आहे. शिवसेना (शिंदे), काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे.
मुरुम नगरपालिकेवर 50 वर्षांपासून पाटील परिवाराची एकहाती सत्ता आहे. माजी मंत्री तथा भाजप लातूरचे जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बापूराव पाटील, भाजप युवानेते शरण पाटील, सौ. संपदा शरण पाटील, स्मिताताई बापूराव पाटील व सर्व उमेदवार यांनी प्रत्येक प्रभागात घेतलेल्या कॉर्नर बैठका, प्रचार पदयात्रा आणि त्यामध्ये मिळत असलेला नागरिकांचा उत्स्फूर्तपणे पाहता विजय दृष्टीपथास दिसत होता. रविवारी झालेल्या मतमोजणीत भारतीय जनता पक्षाचे बापूराव पाटील यांनी 4019 मताधिक्य घेत नगराध्यक्ष पदांची निवडणूक जिंकली आहे.
भाजपाच्या विजयी उमेदवारांची यादी - प्रभाग एकमधुन स्नेहा राम बंडगर (728 मतांनी विजयी), अमर धनराज भोसले (536 मतांनी विजयी), प्रभाग दोन : सचिन गुलाब फनेपुरे (311 मतांनी विजयी), श्रीदेवी नागप्पा दुर्गे (392 मतांनी विजयी), प्रभाग तीन महादेवी बबन बनसोडे (313 मतांनी विजयी), अहमद युनूज मनियार (243 मतांनी विजयी), प्रभाग चार - अंकिता राजकुमार अंबुसे (670 मतांनी विजयी), निरजानंद सच्चिदानंद अंबर (691 मतांनी विजयी), प्रभाग पाच - गौस रशीद शेख (210 मतांनी विजयी), निर्मला प्रकाश कंटेकुरे (471 मतांनी विजयी), प्रभाग सहा - रूपचंद गुंडेराव गायकवाड (252 मतांनी विजयी), मुमताजबी मलंग ढोबळे (200 मतांनी विजयी), प्रभाग सात - ज्योती सुजित शेळके (348 मतांनी विजयी), रमेश दत्तू चव्हाण (172 मतांनी विजयी), प्रभाग आठ- सुनिता मारुती बनणे (558 मतांनी विजयी), राजेंद्र संभाजी बेंडकाळे (512 मतांनी विजय), प्रभाग नऊ- समीना राजाबकसर मुल्ला (135 मतांनी विजयी), प्रभाग दहा - रागिनी भारत गायकवाड (346 मतांनी विजयी), सिद्राय्या सायबण्णा ख्याडे (522 मतांनी विजयी) झाले आहेत. तर प्रभाग 9 मधुन शिवसेना (ठाकरे) चे अजितकुमार अरविंद चौधरी हे 9 मतांनी विजयी झाले आहेत.
