धाराशिव (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र सांस्कृतिक महोत्सव 2025 हा 22 ते 30 सप्टेंबर दरम्यान मोठ्या उत्साहात पार पडला होता. या महोत्सवाच्या दरम्यान 29 सप्टेंबर रोजी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ड्रोन शोचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, त्या काळात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे तसेच ढगाळ वातावरणामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव हा ड्रोन शो स्थगित करण्यात आला होता.
दरम्यान, 28 डिसेंबर ते 3 जानेवारी या कालावधीत श्री तुळजाभवानी देवींचा शाकंभरी नवरात्र उत्सव साजरा केला जात आहे. या शाकंभरी नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून, यापूर्वी स्थगित करण्यात आलेला ड्रोन शो आता 2 जानेवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा भव्य ड्रोन शो शुक्रवारी, 2 जानेवारीला सायंकाळी 6 वाजता श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयाच्या मैदानावर पार पडणार आहे.
या ड्रोन शोमध्ये तब्बल 300 ड्रोनच्या सहाय्याने आकाशात तुळजाभवानी मंदिर, श्री तुळजाभवानी देवी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह विविध आकर्षक प्रतिकृती साकारण्यात येणार असून, त्यामध्ये श्री तुळजाभवानी देवींची भव्य प्रतिकृती हे मुख्य आकर्षण असणार आहे. यासोबतच धार्मिक, सांस्कृतिक आणि कलात्मक स्वरूपाच्या अन्य प्रतिकृतीही आकाशात झळकणार आहेत. अत्याधुनिक प्रकाशयोजना व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून साकार होणारा हा ड्रोन शो भाविकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे.
विशेष म्हणजे, अशा प्रकारचा ड्रोन शो धाराशिव जिल्ह्यात प्रथमच आयोजित करण्यात येत असून, त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये तसेच भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्सुकता निर्माण झाली आहे. देवीच्या दर्शनासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम अनुभवण्याची संधी भाविकांना मिळणार आहे. या भव्य ड्रोन शोचा आनंद घेण्यासाठी भाविकांनी तसेच धाराशिव जिल्ह्यातील आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात येत आहे. शाकंभरी नवरात्रोत्सवाच्या धार्मिक वातावरणात हा ड्रोन शो भक्ती आणि आधुनिकतेचा सुंदर संगम ठरेल.


