धाराशिव (प्रतिनिधी)- साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची ज्योत पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावी,या उदात्त हेतूने धाराशिव शहरात भव्य स्मारक उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला असल्याची माहिती पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. या स्मारकासाठी मित्र चे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी विशेष प्रयत्न केले होते.
या निर्णयानुसार धाराशिव नगरपालिकेला सर्व्हे क्रमांक 426 येथील आवश्यक 1 एकर जमीन भोगाधिकार विनामूल्य, मूल्यरहित व महसूलमुक्त किंमतीने उपलब्ध करून देण्यास कॅबिनेटची मंजुरी देण्यात आली आहे.त्यामुळे अण्णाभाऊ साठे स्मारकाच्या स्वप्नाला अधिकृत आणि ठोस स्वरूप प्राप्त झाले आहे.जमीन नगरपालिकेच्या ताब्यात आल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत पुतळा उभारणीसाठी आवश्यक सर्व परवानग्या देण्यात येणार असून प्रशासकीय प्रक्रिया वेगाने पूर्ण केली जाणार आहे.
या स्मारकाच्या उभारणीसाठी नगरविकास विभागाने 2 कोटीं रुपयांचा निधी मंजूर केला असून,या निधीतून स्मारक भव्य, दर्जेदार व प्रेरणादायी स्वरूपात साकारले जाणार आहे. पालकमंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, “लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते,तर ते शोषित,वंचित आणि कष्टकरी समाजाचा बुलंद आवाज होते.त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी हे स्मारक उभे राहत असून,ते सामाजिक न्याय,समता आणि लोकशाही मूल्यांचे प्रतीक ठरेल.” धाराशिवच्या भूमीत उभे राहणारे हे स्मारक भावी पिढ्यांना प्रेरणा देणारे,परिवर्तनाची जाणीव करून देणारे आणि अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचे तेज सदैव उजळवत ठेवणारे ठरेल,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
