धाराशिव (प्रतिनिधी)- कुष्ठरोगाचा लवकर शोध घेऊन वेळेवर उपचार केल्यास रोगाचा प्रसार रोखता येतो व कुष्ठरोग पूर्णपणे बरा होऊ शकतो,या उद्देशाने जिल्ह्यात 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2025 या कालावधीत विशेष कुष्ठरोग रुग्ण शोध अभियान राबविण्यात आले. या अभियानाअंतर्गत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर घरोघरी जाऊन 15 लाखांहून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली.
हे अभियान यशस्वीरीत्या राबविण्यासाठी 17 नोव्हेंबर 2025 रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समितीची बैठक घेण्यात आली.या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व अधिकारी,कर्मचारी तसेच सर्वेक्षण पथक व स्वयंसेवकांना घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या.तसेच नागरिकांनी तपासणीसाठी येणाऱ्या पथकास सहकार्य करावे,असे आवाहन करण्यात आले.
या अभियानांतर्गत ग्रामीण भागातील 100 टक्के लोकसंख्या तसेच शहरी भागातील निवडक लोकसंख्येची तपासणी करण्याचे नियोजन करण्यात आले.पुरुषांची तपासणी पुरुष स्वयंसेवकांमार्फत,तर महिलांची तपासणी आशा व महिला आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात आली. यासाठी 1202 सर्वेक्षण पथके तयार करण्यात आली असून,त्यांच्या पर्यवेक्षणासाठी 240 पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली. ग्रामीण भागात दररोज सरासरी 20 ते 25 घरे, तर शहरी भागात दररोज सुमारे 30 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. एकूण 3 लक्ष 9 हजार 500 घरांना भेटी देऊन 15 लक्ष 7 हजार 996 नागरिकांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान तालुकानिहाय संशयित रुग्ण शोधण्यात आले असून,वैद्यकीय अधिकारी व कुष्ठरोग कर्मचाऱ्यांनी सखोल तपासणी करून नवीन कुष्ठरुग्णांचे निदान केले. शोधण्यात आलेल्या सर्व नवीन रुग्णांवर बहुविध औषधोपचार सुरू करण्यात आले आहेत.