धाराशिव (प्रतिनिधी)- अल्पसंख्यांक नागरिकांना त्यांची संस्कृती,भाषा,धर्म व परंपरा इत्यादीचे संवर्धन करण्यासोबतच त्यांच्या कल्याणासाठी असलेल्या विविध योजनांची माहिती देऊन दि. 18 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती कार्यालयाच्या सभागृहात अल्पसंख्यांक हक्क दिवस साजरा करण्यात आला. यावेळी अपर जिल्हाधिकारी श्रीमती.ज्योती पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्यांक अधिकारी पुंडलिक गोडसे,जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्रीमती.पाटील यावेळी म्हणाल्या की, मुस्लिम, बौद्ध, शीख, ख्रिश्चन, जैन व पारशी हा समाज अल्पसंख्यांक समुदायात येतो. त्यांच्यासाठी असलेल्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली पाहिजे.योजनांच्या लाभातून त्यांच्या विकासाला गती मिळण्यास मदत होईल. विविध यंत्रणांनी शासनाच्या ज्या योजना आहेत,त्यांच्यापर्यंत त्या प्रभावीपणे पोहोचविल्या पाहिजे.यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे.असे त्या म्हणाल्या.
गोडसे यांनी सांगितले की, अल्पसंख्यांक समाजाच्या सामाजिक आर्थिक व शैक्षणिक उन्नतीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा अल्पसंख्यांक कल्याण समिती गठीत केली आहे.अल्पसंख्यांक संस्थामार्फत चालविण्यात येणाऱ्या अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांना धार्मिक व भाषिक अल्पसंख्यांक दर्जा प्रदान करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची कार्यपद्धती विहित केली आहे.निवासी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येतो.डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना,धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल अनुदानित शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी अनुदान योजना व अल्पसंख्यांक बहुल नागरी व ग्रामीण वस्तीत मूलभूत सुविधा अशा प्रकारच्या योजना राबवण्यात येत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
खडसे यांनी अल्पसंख्यांकांच्या अन्य योजनांची माहिती देखील यावेळी उपस्थित अल्पसंख्याक समुदायातील नागरिकांना दिली.यावेळी अल्पसंख्यांक प्रतिनिधी जुल्फीकार काझी यांनी अल्पसंख्यांक समाजासाठी विविध योजना आहेत.त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. भारतीय राज्यघटनेत अल्पसंख्यांकांचे विकासासाठी विविध कलमे तयार केली आहेत.अल्पसंख्यांकांचा प्रश्न देशापुरताच मर्यादित नाही तर वैश्विक आहे.हा समाज शिक्षणात पुढे जाणार नाही तर विकसित होणार नाही.संविधानांनी दिलेल्या अधिकाराची प्रभावी अंमलबजावणी केली जावी. अल्पसंख्यांकासाठी स्वतंत्र कार्यालय व पुरेसा अधिकारी कर्मचारी वर्ग असावा.अल्पसंख्यांक समाजासाठी अर्थसंकल्पात केलेल्या तरतूदीनुसार निधी राखीव ठेवावा.अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना 7 हजार रुपये शिष्यवृत्ती द्यावी असे ते म्हणाले.
यावेळी समाज भूषण शंकर खुणे म्हणाले की,अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी प्रत्येकाने काम केले पाहिजे. भारतीय संविधानानुसार प्रत्येकाने आपल्या जबाबदाऱ्या पार पाडून समाजाच्या विकासासाठी हातभार लावावा. अल्पसंख्यांक समाजातील विविध घटकांच्या विकासाच्या दृष्टीने काम केले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
सय्यद खलील म्हणाले की,योजना राबवितांना अधिकाऱ्यांनी मानसिकता बदलली पाहिजे.योजनांच्या अंमलबजावणीसाठी अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण झाले पाहिजे.मदरसा आधुनिकीकरण योजनेत सुलभता आली पाहिजे.अल्पसंख्यांक योजना राबविताना प्रामाणिकपणा असला पाहिजे. अल्पसंख्यांक वस्त्यांमध्ये सोयी सुविधा निर्माण केल्या पाहिजे.त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी यंत्रणांनी त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे.समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण व विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जावी असे ते म्हणाले.यावेळी अतुल अजमेरा यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले
या कार्यक्रमाला सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी विष्णू ठोंबरे व चंद्रकांत भगत, समाजभूषण पुरस्कार प्राप्त शंकर खुणे, अल्पसंख्यांक अधिकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शेख खुद्बुद्दीन हुसेन,अतुल अजमेरा,खलील सैफ सय्यद,जुल्फीकार काझी,ॲड.अश्विनी सोनटक्के, ऍड.मायादेवी सरवदे,काझी नसिरुद्दीन शेख,शेख नसरुद्दीन इसाकउद्दीन, ॲड.ज्योती बेडकर,अँड.प्रियंका साबळे, विनीत तेलोरे,शेख नसरुद्दीन,मोहम्मद अझरुद्दीन काझी,ॲड.विद्युलता,इकबाल पटेल,पटेल सिकंदर निजाम साहेब,एजाज बागवान,सुधाकर माळाळे,सलीम मणियार, सिद्दिकी मोजुद्दीन यांची उपस्थिती होती.उपस्थितांचे आभार जिल्हा नियोजन अधिकारी विष्णू ठोंबरे यांनी मानले.
