भूम (प्रतिनिधी)-  भुम तालुक्यातील ईट शिवारात पवनचक्की प्रकल्पाच्या कामावरून स्थानिक शेतकरी आणि कंपनीमध्ये उभा राहिलेला वाद चांगलाच चिघळला असून, जमिनीचा मोबदला मागितल्याच्या पार्श्वभूमीवर पाच शेतकऱ्यांवर 15 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ईट येथील गट नं. 247/अ व 248/ड येथे घडली. टोरेन्ट सोलर पॉवर प्रा. लि. अंतर्गत आय एनर्जी इन्फ्रा प्रा.लि. कंपनीकडून पवनचक्कीचे खड्डे खणणे व रस्ता तयार करण्याचे काम सुरू होते. यावेळी डोकेवाडी येथील शेतकरी गोकुळेश डोके, शोभाबाई डोके, बब्रुवान डोके, औदुंबर डोके व रंजीत डोके यांनी जागेवर येत काम थांबवले. तक्रारीनुसार, शेतकऱ्यांनी आपल्या शेतजमिनीवर कंपनीने करारनाम्यापेक्षा वेगळा वापर करत असल्याचा आक्षेप घेत काम रोखले. शेतकऱ्यांच्या मते, पवनचक्की प्रकल्पामुळे जमीन कायमस्वरूपी वापरातून जाते. त्यामुळे योग्य मोबदला व चर्चा आवश्यक आहे. मात्र फिर्यादी अजयकुमार शर्मा (वय 56)  कंपनीचे अधिकारी यांचेनुसार शेतकऱ्यांनी “15 लाख रुपये द्या तेव्हाच कामाला परवानगी” अशी मागणी केली. तसेच कंपनीची वाहने रस्त्यात उभी करून काम पूर्णपणे थांबवण्यात आले, असेही त्यांनी म्हटले.  संध्याकाळी 7 वाजता, आरोपी रंजीत डोके यांनी फोन करून “येथे काम करायचे असेल तर 15 लाख रुपये द्या, नाही तर काम होऊ देणार नाही” असे सांगितल्याचा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.


शेतकऱ्याने काय सांगितले

घटनानंतर ईट शिवारात आणि परिसरात चर्चा सुरू झाली आहे.याबाबत शेतकरी गोकुळ औदुंबर डोके यांची प्रतिक्रिया घेतली असता आम्ही फक्त आमच्या शेतातून वाहने नेऊ नका, वाहने न्यायची असेल तर मोबदला द्या. अशी मागणी केली होती. यावर कंपनीने माझ्यावर व कुटूंबातील आई, वडील यांच्यावर खंडणीचा खोटा गुन्हा दाखल केला आहे. 

 
Top