धाराशिव (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 12 डिसेंबर रोजी जिल्ह्यात भव्य वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात येणार आहे.पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत पक्षाचे कार्यकर्ते, स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांच्या सहभागातून तब्बल एक हजार वडाच्या वृक्षाची लागवड करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी दिली.
जिल्ह्यात विविध ठिकाणी आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमांमध्ये पवार साहेबांच्या दीर्घ सार्वजनिक जीवनातील योगदानाची आठवण करून देऊन पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार घेणे हीच खरी वाढदिवसाची भेट असेल .वडाचे झाड ‘आयुष्याचे प्रतीक' मानले जाते. दीर्घायुष्य, सावली आणि ऑक्सिजन भरपूर देते यामुळे वडाची लागवड विशेष महत्त्वाची ठरते.
अनेकांना या रोपांची देखभाल करण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे .“वडाला जगवलं तर पिढ्या जगतात,” या भावनेने वृक्षारोपण या उपक्रमामुळे जिल्ह्यात हरित वातावरण निर्मितीला चालना मिळेल, असा विश्वास डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी व्यक्त केला.
