परंडा (प्रतिनिधी)- परंडा शहरातील कुर्डवाडी रोड येथे राहणाऱ्या 69 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाकडे दोन आरोपींनी 10 लाख रुपयांची खंडणी मागून रक्कम न दिल्यास कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दीपक द्वारकाप्रसाद तिवारी (वय 69) यांना आरोपी अमर दयानंद तिवारी व आनंद दयानंद तिवारी (दोघे रा. शिक्षक सोसायटी, परंडा) यांनी वारंवार फोन करून, आम्ही आर्थिक अडचणीत आहोत असे सांगत रु. 10,00,000 इतकी खंडणी मागितली. फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्यावर आरोपींनी फिर्यादीच्या घरातील मुलगा, मुलगी व सुन यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे. ही घटना 11 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 7.30 वाजता सर्वे नं. 45, कुर्डवाडी रोड, परंडा येथे घडली. त्यानंतर फिर्यादीने 4 डिसेंबर 2025 रोजी परंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. फिर्यादीच्या प्रथम खबरीवरून परंडा पोलीसांनी नमूद आरोपींवर भा.दं.वि. कलम 33, 308(2)(4), 351(2)(4), 3(5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास परंडा पोलीस ठाण्याचे पथक करीत आहे.