कळंब (प्रतिनिधी)-  वाशी तालुक्यातील दसमेगाव सह इतर गावातील जवळपास 20 ते 25 शेतकऱ्यांना जास्त भाड्याचे आमीष दाखवून नवीन - कोरे ट्रॅक्टर व जेसीबी घेऊन जवळपास 1 कोटी 22 लाख रुपयाचा मुद्देमाल घेऊन फरार झालेले आरोपी कळंब पोलिसांनी कारवाई करून 27 डिसेंबर रोजी मेन म्होरक्यासह 4 आरोपींना अटक करून 45 लाख रुपयाचा मुद्देमाल सह जप्त करून कळंब च्या न्यायालयासमोर हजर केले असता आरोपीना 3  दिवसाची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. या कारवाईमुळे कळंब, वाशी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे .

याबाबत कळंब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बालाजी श्रीहरी मोरे वय 40 वर्षे रा.दसमेगाव ता. वाशी जि धाराशिव यांनी दि.04 डिसेंबर 2025 रोजी कळंब पोलीसात दिलेल्या फिर्याद वरुन पोस्टे कळंब गु.र.नं 458/ कलम 318(4), 236, 237, 336(2), 338, 336, 340,3(5), भा.न्या.स दाखल असुन त्याचा तपास पोउपनि डी.जे घाडगे हे करीत असताना गुन्हयात 22 ट्रॅक्टर व 2 जे.से.बी चा समावेश होता. यात संबंधित आरोपींनी जास्त भाड्याचे आमिष दाखवून वाशी तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा गंडा घालून 22 ट्रॅक्टर व 2 जीसीबी घेऊन गेल्या 11 महिन्यापासून फरार होते. ना भाडे, ना वाहने, ना संपर्क अशी अवस्था या शेतकऱ्यांची झाली होती. यावरून दसमेगाव येथील शेतकऱ्यांनी कळंब पोलिसात येऊन तक्रार दाखल केली होती.  या तक्रारीवरून कळंब पोलिसांनी तातडीने आपली चक्र फिरवून 2 जेसीबी व 1 ट्रॅक्टर मौजे लाकडी, ता इंदापुर, जि पुणे येथुन जप्त केला आहे. तसेच यातील मुख्य आरोपी  अजय संतोष चव्हाण, रा. सरताळे, ता जावळी, जि. सातारा हा व त्याचे 4 साथीदारांसह लोणंद पोलीस स्टेशन हददीत जि. सातारा येथे  पुष्कर पुष्पशील साळुंके, रा. म्हसोबाचीवाडी, ता. इंदापुर, जि पुणे,  सोमनाथ शंकर ढमाळ, रा. म्हसोबाचीवाडी, ता. इंदापुर, जि पुणे,  दत्तात्रय संताजी गाडेकर, रा वाकी चोपडज, ता बारामती, जि पुणे,  आकाश अंकुश गाडे, रा मुरुम, ता बारामती, जि पुणे यांचे सह मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडील 1 ट्रॅक्टर, दोन जेसीबी घेऊन पोलीस कळंब पोलीस ठाण्यात घेऊन आले. त्यांना दि. 27 डिसेंबर रोजी अटक करून कळंब न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडीत सुनावली आहे. या धाडसी कारवाईत पोलीस अधीक्षक रितू खोकर व उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पवार ,पोलीस निरीक्षक अजित चिंतले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक डी .जे .घाडगे व त्यांचे सहकारी  पो.कॉ. अशोक करवर, पो कॉ.औदुंबर गजबार, पो .कॉ.परमेश्वर कदम, पो.कॉ.गोविंद मोटेगावकर, पो.कॉ.भारत गायकवाड, पो.ना.भाऊसाहेब पौळ हे उरलेल्या 21 ट्रॅक्टर चा तपास कळंब पोलीस करीत आहेत.


 
Top