धाराशिव (प्रतिनिधी)- नगर परिषद व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी येत्या 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार आहे.निवडणूकीच्या काळात जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून शांतता कायम राहावी याची दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांनी दिले.
नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक - 2025 च्या अनुषंगाने जिल्हास्तरीय निवडणूक संनियंत्रण समितीची सभा जिल्हाधिकारी पूजार यांच्या अध्यक्षतेखाली त्याच्या कक्षात घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, नगरपरिषद प्रशासन विभागाचे सहआयुक्त त्रिंबक ढेगळे,जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक चिन्मय दास,राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक हर्षवर्धन शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता एन.व्हि.भंडे, पोलीस उपअधीक्षक (गृह) डी.बी.पारेकर, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, सहायक राज्यकर आयुक्त प्रदीप चव्हाण,वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता एन.एम.कुलकर्णी व सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत साळी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
निवडणूक डयूटीवर असलेल्या अधिकारी- कर्मचाऱ्यांची नावे ज्या नगरपालिकेच्या मतदार यादीत आहे, त्यांना पोस्टल मतदान करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे असे पूजार यांनी यावेळी सांगितले. संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या विभागामार्फत निवडणूकीच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती यावेळी दिली.
