तुळजापूर (प्रतिनिधी)-  जागतिक ख्यातीचे संगणक शास्त्रज्ञ, भारतातील  सुपरकंप्यूटर मालिकेचे जनक व पद्मभूषण, महाराष्ट्रभूषण पुरस्कार विजेते डॉ. विजय पांडुरंग भटकर यांनी आज श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांनी अत्यंत समाधान, कृतार्थता आणि आध्यात्मिक आनंद व्यक्त केला.

दर्शनानंतर बोलताना डॉ. भटकर म्हणाले की, “तुळजाभवानी मातेच्या दर्शनाने ऊर्जा, प्रेरणा आणि संरक्षणाची अनुभूती मिळाली. मंदिर संस्थानाने केलेल्या व्यवस्थापनाबद्दल मी मनःपूर्वक आभार मानतो.”

या भेटीदरम्यान तहसीलदार व मंदिर संस्थान व्यवस्थापक श्रीमती माया माने मॅडम, जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध देशपांडे तसेच मंदिर संस्थानचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते तसेच श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तर्फे तहसीलदार तथा व्यवस्थापक प्रशासन श्रीमती माया माने मॅडम यांनी त्यांचा देवीजींची प्रतिमा देऊन सत्कार केला. भारताच्या संगणक व माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात अत्यंत मोलाची कामगिरी करणारे डॉ. विजय भटकर हे देशातील वैज्ञानिक समुदायातील एक मान्यवर नाव आहे. त्यांनी अनेक सुपरकंप्यूटर विकसित करण्याचे नेतृत्व केले असून विविध राष्ट्रीय संशोधन संस्थांच्या विकासात मोठे योगदान दिले आहे.

 
Top