धाराशिव (प्रतिनिधी)- शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान,कृषि सल्ला आणि विविध योजनांची माहिती एका ठिकाणी उपलब्ध व्हावी या उद्देशाने विकसित केलेले महाविस्तार ॲप हे शेतकऱ्यांसाठी डिजिटल वरदान ठरत आहे. 

जिल्ह्यात 16 नोव्हेंबर 2025 पर्यंत 5030 शेतकऱ्यांनी हे ॲप डाउनलोड केले असून ही एक सकारात्मक बाब असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी सांगितले.शासनाने डिसेंबर 2025 पर्यंत प्रत्येक गावातील किमान 20 टक्के शेतकऱ्यांनी हे ॲप डाउनलोड करून सक्रिय वापर करावा,असे उद्दिष्ट निश्चित केले आहे.


ॲपची वैशिष्ट्ये आणि उपयुक्तता :

महाविस्तार ॲप हे कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित असून,शेतकऱ्यांच्या विशिष्ट ओळख क्रमांकाद्वारे लॉग-इन करून वैयक्तिक आणि शेतकरी केंद्रित सेवा पुरवते.

मराठी एआय चैटबॉट शेतीसंबंधी प्रश्नांचे त्वरित निरसन करतो.हवामान अंदाज व बाजारभाव रिअल टाइममध्ये उपलब्ध होत असल्याने पेरणी, कापणी आणि विक्रीचे योग्य नियोजन करता येते.कृषी योजना,अनुदाने, विमा योजना यांची सविस्तर माहिती एका व्यासपीठावर मिळते.पीक व्यवस्थापन,खत नियोजन,कीड-रोग नियंत्रण व आधुनिक शेती पद्धतीवरील मार्गदर्शक मराठी व्हिडिओही उपलब्ध आहेत.

उद्दिष्टपूर्तीसाठी कृषी विभागाची मोहीम शासनाने निश्चित केलेले 20 टक्के डाउनलोडचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कृषी विभाग सक्रिय झाला आहे.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे यांनी सर्व उपविभागीय कृषी अधिकारी आणि तालुकास्तरावरील यंत्रणेला प्रभावी अंमलबजावणीच्या सूचना दिल्या आहेत. याअंतर्गत  गावांमध्ये प्रात्यक्षिके व जनजागृती मोहिमा,कृषि सेवा केंद्रे, कृषि सखी आणि कृषिताई यांच्या माध्यमातून गट तयार करणे,ॲपचा सक्रिय वापर करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार,व्हॉट्सॲप व सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यापक प्रसार अशा उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे यांनी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आवाहन केले आहे की,प्ले स्टोअरवर महाविस्तार ॲप  किंवा महाविस्तार ॲप एआय शोधून ते डाउनलोड करावे आणि आपल्या ओळख क्रमांकाद्वारे लॉग-इन करून सेवा व सल्ल्यांचा लाभ घ्यावा. शाश्वत शेती आणि समृद्ध शेतकरी या ध्येयाने प्रेरित होत. महाविस्तार ॲपच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याने डिजिटल क्रांतीचा भाग व्हावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

 
Top