तुळजापूर (प्रतिनिधी)- नगरपालिका निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देत मठाधिपती सोमवार गिरी मठाचे महंत इच्छागिरी महाराज यांनी स्पष्ट केले आहे की, “मी या लढतीचा भाग नसणार आहे.” असे निवेदन देऊन जाहीर केले.

श्री क्षेत्र तुळजापूर हे शक्तीपीठ, धर्म, परंपरा आणि अध्यात्म यांचे केंद्रस्थान असल्याचे सांगत ते म्हणाले की, समाजात अराजकता वाढू लागली की धर्मसत्तेने मार्गदर्शन करणे आवश्यक ठरते. याच भावनेतून महंत योगी मावजीनाथ महाराज आणि महंत व्यंकट अरण्य महाराज यांच्या सहकार्याने त्यांनी या निवडणुकीत हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला होता. निवडणूक जाहीर झाल्यानंतर अनेक नागरिक भेटू लागल्याने मोठा लोकाग्रह निर्माण झाला. शहरातील ज्येष्ठ मान्यवर, प्रतिष्ठित नागरिक तसेच सर्व पक्षांचे नेतेपदाधिकारी यांच्या उपस्थितीत चर्चा झाली. या चर्चेदरम्यान नगराध्यक्ष पद बिनविरोध करण्याचे प्रस्तावही पुढे आले, मात्र काही कारणांमुळे तो प्रयत्न सफल झाला नाही. महंत इच्छागिरी महाराज यांनी भाजपाच्या नावे एक अर्ज व एक अपक्ष असा दोन उमेदवारी अर्ज भरला होता. भाजपाची अधिकृत उमेदवारी न मिळाल्यामुळे पक्षाचा अर्ज बाद झाला; परंतु अपक्ष अर्ज कायम राहिला. अर्ज मागे घेण्यासाठी गेले असता वेळेअभावी ते शक्य झाले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.


“मी या लढतीत नाही”तुळजापूरकरांना संदेश

निवडणूक प्रक्रियेतील इतर उमेदवारांपैकी योग्य व्यक्तीची निवड करावी, असे आवाहन करत त्यांनी म्हटले“ आपण फक्त एक बटण दाबत नाही; आपण पाच वर्षांचे भविष्य ठरवत आहोत. 100% मतदान करा.”या सर्व प्रक्रियेत सहकार्य केलेल्या तुळजापूरच्या ज्येष्ठ नागरिक, सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार मानले.या निवेदनावर महंत योगी मावजीनाथ महाराज, महंत इच्छागिरी महाराज, महंत व्यंकट अरण्य महाराज यांची स्वाक्षरी आहे.

 
Top