धाराशिव (प्रतिनिधी)- आगामी ३ डिसेंबर रोजी होणाऱ्या ‘जागतिक दिव्यांग दिना’निमित्त जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या, शासकीय कार्यालये, शाळा व महाविद्यालयांनी विशेष उपक्रम राबवावेत, अशी मागणी प्रहार दिव्यांग संघटना, धाराशिव जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांच्या पदधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात दिव्यांग व्यक्तींबाबत जनजागृती, त्यांच्या हक्कांची माहिती, विविध योजनांचा प्रसार आणि सामाजिक संवेदनशीलता वाढविण्यासाठी जिल्हास्तरावरून स्पष्ट निर्देश देण्याची विनंती करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, शासकीय कार्यालये व शैक्षणिक संस्थांनी ३ डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्याचे आदेश द्यावेत. जनजागृती कार्यक्रम, आरोग्य तपासणी शिबिरे, सन्मान समारंभ, तसेच दिव्यांग हक्क व योजना मार्गदर्शनाचे उपक्रम आयोजित करण्याचे निर्देश द्यावेत. दिव्यांगांच्या तक्रारी व मागण्यांसाठी विशेष तक्रार निवारण दिवस आयोजित करावा. शासकीय कार्यालयांमध्ये रॅम्प, सुलभ प्रवेश, मार्गदर्शक फलक इत्यादी सुविधा तपासून आवश्यक सुधारणा कराव्यात. या उपक्रमांमुळे दिव्यांग बांधवांच्या हक्कांचे संरक्षण, आत्मविश्वास वृद्धी आणि समाजातील सकारात्मकता वाढण्यास मदत होईल, असे संघटनेने नमूद केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या मागण्यांचा सकारात्मक विचार करून तातडीने आदेश जारी करावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. सदरील निवेदन जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाउपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, कार्याध्यक्ष महादेव खंडाळकर, शहराध्यक्ष जमीर शेख, जिल्हा सहसंघटक मेहबूब तांबोळी, तसेच प्रकाश खडके, सागर पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
