धाराशिव (प्रतिनिधी)- ‌ ‘बालविवाह मुक्त भारत  100 दिवसांचे अभियान' या उपक्रमाचे औचित्य साधत चाईल्ड हेल्पलाईन धाराशिव चमूने जिल्ह्यातील दोन बेकायदेशीर बालविवाह रोखण्यात यश मिळवले आहे. धाराशिव येथील भीमनगर आणि तुळजापूर तालुक्यातील पिंपळे (खुर्द) येथे होणारे दोन बालविवाह चाईल्ड हेल्पलाईन 1098 च्या तत्पर हस्तक्षेपामुळे थांबविण्यात आले.

दि.21 नोव्हेंबर रोजी चाईल्ड हेल्पलाईनला प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीनुसार, भीमनगर येथे एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाचा,तर पिंपळे खुर्द येथे एका 16 वर्षीय अल्पवयीन बालिकेचा विवाह होणार असल्याचे समजताच चमूने तातडीने पथके रवाना केली.विवाहस्थळी पोहोचून संबंधितांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली असता दोघेही अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 नुसार मुलीचे किमान वय 18 वर्षे आणि मुलाचे वय 21 वर्षे असणे बंधनकारक आहे. त्यामुळे दोन्ही विवाह बेकायदेशीर असल्याने तत्काळ ते रोखण्यात आले.

ही कारवाई प्रभारी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी किशोर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अमोल कोवे आणि जिल्हा प्रकल्प समन्वयक विकास चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पार पडली.चमूमध्ये अमर भोसले (सुपरवायझर), योगेश माने तसेच शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दराडे व त्यांचे सहकारी सहभागी होते. दोन्ही प्रकरणांत संबंधित बालक/बालिका व त्यांच्या पालकांचे समुपदेशन करण्यात आले.त्यांनी बालविवाह न करण्याबाबत हमीपत्र दिले असून पंचनामा करण्यात आला आहे. त्यानंतर या दोन्ही बालक/बालिका यांना बालकल्याण समिती, धाराशिव यांच्यासमोर सादर करण्यात आले आहे. प्रशासनाने आवाहन केले आहे की, बालविवाहाची कोणतीही माहिती मिळाल्यास तत्काळ चाईल्ड हेल्पलाईन 1098 या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, जेणेकरून भविष्यातील बालविवाहाचे अनिष्ट प्रकार रोखता येतील.

 
Top