धाराशिव (प्रतिनिधी)- आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगर पालिका, नगरपरिषद, नगर पंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका संभाजी ब्रिगेड लढणार असल्याचे सूतोवाच नुकत्याच पार पडलेल्या राज्य कार्यकारणी बैठकीमध्ये संभाजी ब्रिगेड अध्यक्ष ॲड. मनोज आखरे यांनी केले आहे. त्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्थानिक राजकीय परिस्थिती लक्षात घेवून समविचारी पक्षाबरोबर युती-आघाडी किंवा स्वबळावर लढण्याची तयारी संभाजी ब्रिगेडने केली आहे.

संभाजी ब्रिगेडचे राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांनी गेल्या अनेक दिवसांपासून या निवडणुकीची तयारी सुरू केली असून शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन अनेक आंदोलने केली आहेत. मराठवाड्यासह महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीने कहर केला असून शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास अस्मानी संकटाने हिरावून घेतला आहे. अशा स्थितीत सरकार शेतकऱ्यांची चेष्टा करत आहे. संभाजी ब्रिगेडने झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी लक्षवेध आंदोलन केले. तरीही सरकार झोपेच सोंग करत असल्याचा आरोप ॲड. आखरे यांनी केला आहे. पुन्हा संभाजी ब्रिगेडने सत्ताधरी आमदार खासदार मंत्र्यांच्या घरासमोर जागरण गोंधळ आंदोलन केले. तरीही सरकारला जाग येत नसल्यामुळे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते जिल्हा परिषद, पंचायत समितीसह नगर परिषद निवडणुकीत निवडून आणून शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करून जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी निवडणुकीला सामोरे जात आहेत.

आधीच महागाई, बेरोजगारीने जनता त्रस्त झाली आहे. कापूस, सोयाबीन, कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. अस्मानी आणि सुलतानी संकटाने पीडलेला बळीराजा कर्जमाफीची वाट पाहत आहे. विधानसभा निवडणुकीत आजच्या सत्ताधारी महायुती सरकारने शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याचा शब्द दिला होता मात्र आता योग्य वेळ शोधत आहेत. महाराष्ट्रात दर दिवसाला 3 शेतकरी आत्महत्या करत आहेत. राज्यात महिला सुरक्षित नाहीत, कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत, सत्ताधारी व विरोधी पक्ष गुंडांचे पालन पोषण करण्यात दंग आहेत. आता राजकीय पक्ष म्हणून खऱ्या अर्थाने फक्त संभाजी ब्रिगेडच जनतेचा आवाज होऊ शकते अशी परिस्थिती आहे. या वेळी महाराष्ट्रातील मतदार नक्कीच संभाजी ब्रिगेड ला पसंती देईल असा आम्हाल विश्वास आहे. स्थानिक राजकीय परिस्थिती नुसार समविचारी पक्षां बरोबर युती - आघाडी करून या निवडणूका लढण्यासाठी संभाजी ब्रिगेड सज्ज झाली असल्याचे जिल्हाध्यक्ष ॲड. तानाजी चौधरी यांनी सांगितले.

धाराशिव, कळंब भूम, परंडा आणि वाशी येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवडणूक लढण्यास तयार असलेल्या ईच्छुकांनी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक अतुल गायकवाड आणि माजी जिल्हाध्यक्ष ॲड. तानाजी चौधरी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

 
Top