तुळजापूर (प्रतिनिधी)- प्रतिवर्षाप्रमाणे मोठ्या भक्तिभावाने साजरा होणारा श्री तुळजाभवानी देवींचा शाकंभरी नवरात्र महोत्सव यंदा 20 डिसेंबर ते 4 जानेवारी या काळात उत्साहात पार पडणार आहे. याबाबतच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज मंदिर संस्थानच्या प्रशासकीय कार्यालयात जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली.

बैठकीस तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, महंत तुकोजी बुवा, महंत चिलोजी बुवा, पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे, अमरराजे कदम, अनंत कोंडो, आरोग्य विभागाचे अविनाश ढगे, सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन चौधर तसेच मंदिर संस्थानाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आगामी महोत्सवाचे नियोजन, सुरक्षा, भक्त व्यवस्थापन आणि पूजाविधींचे आयोजन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. मंदिर संस्थानच्या वतीने महोत्सव काळात अपेक्षित असलेल्या भक्तवर्गाच्या व्यवस्थापनासाठी सुरक्षा, स्वच्छता तसेच वाहतूक व्यवस्थापन याबाबत आवश्यक ती तयारी करण्यात येणार आहे. यावेळी सर्व विभागांना समन्वयातून नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार यांनी दिल्या.



महोत्सवातील प्रमुख धार्मिक कार्यक्रम 

20 डिसेंबर ते 28 डिसेंबर -या कालावधीत श्री तुळजाभवानी देवींची मंचकी निद्रा परंपरेनुसार सुरू राहणार आहे. 28 डिसेंबर रोजी पहाटे देवींची सिंहासनावर प्रतिष्ठापना होणार असून दुपारी 12 वाजता घटस्थापना करण्यात येणार आहे. 29 डिसेंबर रोजी रथ अलंकार महापूजा, 30 डिसेंबर मुरली अलंकार महापूजा, 31 डिसेंबर रोजी सकाळी जलयात्रा तसेच शेषशायी अलंकार महापूजा, 1 जानेवारी रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा, 2 जानेवारी रोजी महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा, 3 जानेवारी रोजी शाकंभरी पौर्णिमा देवीची नित्योपचार पूजा, दुपारी 12 वाजता पूर्णाहुती व घटोत्थापन, 4 जानेवारी रोजी भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन.

 
Top