धाराशिव (प्रतिनिधी)- स्वतःच्या फायद्यासाठी बनावट दस्त तयार करून शौचालयाचे अनुदान लाटल्याप्रकरणी आळणीचे तत्कालीन सरपंच, ग्रामसेवकासह सात जणांविरूध्द धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्यात मंगळवारी गुन्हा नोंद झाला आहे. न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये हा गुन्हा दाखल झाला आहे.
तालुक्यातील आळणी येथील सरपंच महानंदा संतोष चौगुले, ग्रामसेवक सुयज्ञ वशिष्ठ मैंदाड, बबन विठ्ठल माळी, गयाबाई बबन माळी, धनंजय बबन माळी, तानाजी विठ्ठल माळी, फुलचंद सदाशिव माळी यांनी 2016-2011 ते 29 ऑगस्ट 2024 रोजी आळणी येथे स्वतःच्या फायदा करून घेण्यासाठी संगणमत करून बनावट दस्त तयार करून शौचालयाचे अनुदान उचलले. तसेच जंगम मठाच्या जमिनीवर ही काही व्यक्तींनी कब्जा केला आहे. त्या जमिनीचे देखील बनावट दस्त तयार करून अनुदान उचलून शासकीय रक्कमेचा अपहार केला. अशी तक्रार अंबऋषी अर्जुन कोरे यांनी धाराशिव येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दाखल केली होती. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले होते.