धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरात भारतीय जनता पक्षाच्या जागा वाटपाच्या आडमुठया भूमिकेमुळे व नेत्यांच्या दुराग्रहामुळे धाराशिव शहर नगरपालिकेसाठी होणारी भाजपासोबतची होणारी महायुती आता संपुष्टात आली आहे. निवडणूक रिंगणात शिवसेना आपले 21 उमेदवार नगरसेवक पदासाठी उभा करणार आहे. नगराध्यक्ष पदाबाबत वरिष्ठ नेते ज्या सूचना व निर्देश देतील त्याप्रमाणे निवडणूक रणनिती ठरविण्याता येणार आहे. अशी माहिती शिवसेनेचे जिल्हा संघटक सुधीर पाटील यांनी याबाबत के. टी. पाटील फार्मसी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित शिवसेना उमेदवारांच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक पदाचे उमेदवार देखील उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना सुधीर पाटील यांनी सांगितले की, मागील काही महिन्यापासून धाराशिव नगरपालिका निवडणुकीबाबत व महायुतीबाबत मुंबई येथे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील व पदाधिकारी आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बैठकीनंतर नगरपालिका निवडणुकीत महायुती करण्याचे ठरले होते. परंतु प्रत्यक्ष जागा वाटपाच्या वेळेस भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी शिवसेनेला नगण्य चार जागांची ऑफर दिल्याने व जागा वाटपाबाबत शिवसेनेला शेवट पर्यत गाफील ठेवल्याने ही युती संपुष्टात आल्याचे पाटील यांनी सांगितले. वास्तविक धाराशिवची जनता भाजपा व त्यांच्या विरोधातील उबाठा गटाच्या श्रेयवादाच्या व अडवणुकीच्या भूमिकेला कंटाळली आहे. त्यांच्या वैयक्तिक आकांक्षेच्या राजकारणापोटी जिल्हा नियोजन समितीच्या विकास निधीला व धाराशिव शहरातील रस्ते विकासाच्या निधीला ब्रेक लागला असून धाराशिवकर जनता या दोघांनाही कंटाळली आहे. त्यामुळे शिवसेनेने 21 नगरसेवक पदाच्या उमेदवारासह जनतेला पर्याय उपलब्ध करून दिला आहे.
शहरातील जनता भाजपा व उबाठाच्या राजकारणाला कंटाळली आहे. त्यामुळे शिवसेना हा समर्थ पर्याय या निवडणुकीत जनतेस उपलब्ध झाला आहे. शिवसेना 21 जागांपैकी 15 ते 20 जागेवर आपले नगरसेवक निश्चित निवडून आणेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आणि नगराध्यक्ष पदाच्या भूमिकेबाबत वरिष्ठ नेते जे सूचना देतील त्या सूचनाचे पालन शिवसैनिक करतील अशी भूमिका त्यांनी मांडली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंखे यांनी शहरातील अकरा जागांची व आपण स्वतः दहा जागांची जबाबदारी घेतली असून या सर्व जागेवर शिवसेनेचे नगरसेवक पदाचे उमेदवार विजयी करण्यासाठी आपण आहोरात्र परिश्रम घेत असल्याचे सुधीर पाटील यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले. या पत्रकार परिषदेस नगरसेवक पदाचे उमेदवार प्रेमाताई सुधीर पाटील, अमरसिंह देशमुख, मुंडे यांच्यासह इतर उमेदवार उपस्थित होते.
