धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस आघाडीने आज प्रचाराचा नारळ फोडत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार संगीताताई सोमनाथ गुरव यांच्यासह आघाडीतील सर्व उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ उत्साहात पार पडला. यावेळी उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेल्या कार्यकर्त्यांनी नाराजी दूर सारून प्रचार मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग घेतला.
प्रचाराच्या आरंभी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदुभैय्या राजेनिंबाळकर, माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील, विश्वास शिंदे, उमेश राजेनिंबाळकर, पंकज पाटील, प्रशांत पाटील यांच्यासह आघाडीचे सर्व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि स्थिर कारभारासाठी आघाडीच्या उमेदवारांना एकदिलाने निवडून द्या, असे आवाहन यावेळी मान्यवरांच्या वतीने करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात उमेदवारांचे स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसेना उबाठा गट आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह पाहायला मिळाला.शहराचे दैवत धारासुर मर्दिनी देवी मंदिरात मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली. तर हजरत ख्वाजा शमसोद्दीन गाजी रहे.यांच्या दर्गामध्ये मान्यवरांनी फुलांची चादर अर्पण करून आशीर्वाद घेतले. यावेळी नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. त्यामुळे आघाडीचा विजय निश्चित असल्याचा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला. धाराशिवमध्ये शिवसेना उबाठा गट आणि काँग्रेसची आघाडी झाली असून, या आघाडीचा जाहीर प्रचार सुरू झाला आहे. यापूर्वी प्रत्येक उमेदवारांनी थेट मतदारांपर्यंत जाऊन भेटीगाठी सुरू केल्या आहेत. एकंदर उद्यापासून खऱ्या अर्थाने प्रचाराची रणधुमाळी सुरू होईल अशी स्थिती आहे.
