तुळजापूर (प्रतिनिधी)-  पंचायत समिती तुळजापूर कार्यालयातील काही अधिकाऱ्यांचा “एकाच टेबलावर” वर्षानुवर्षे जम बसलेला आहे. पद बदलले, अधिकारी बदलले, गटविकास अधिकारीही गेले  पण काही टेबलधारी मात्र आजवर हलले नाहीत! त्यामुळे तालुक्यात चर्चा रंगली आहे की, “या टेबलावर एवढं सोनं आहे का?”

मिळालेल्या माहितीनुसार, पंचायत समितीतील काही अधिकारी गेली अनेक वर्षे त्याच जागेवर बसून “टेबलराज” चालवत आहेत. कोणती फाईल पुढे जाईल, कोणती थांबेल, कोणती ‌‘त्रुटी' दाखवायची आणि कोणती ‌‘ओके' करायची हे सर्व ठरते. त्या “टेबलावरूनच”नागरिकांमध्ये आरोप आहेत की या टेबलधाऱ्यांकडून. फाईल पुढे ढकलण्यासाठी अर्थपूर्ण बोलणी होतात अशी चर्चा आहे. “ज्याने दिले, ते ओके; ज्याने नाही दिले, त्याची थांबवून ठेवायची” असा सर्रास कारभार चालू आहे.

पंचायत समितीतील काही महिला कर्मचारी, अभियंते, व इतर अधिकारी यांना या “किंगमेकर”ची माहिती असली तरी कोणीही उघडपणे बोलत नाही. कारण, हे टेबल म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी ठरली आहे.  हा भ्रष्टाचाराचा साखळी कारभार आजवर सुरू राहिला आहे. आवक-जावक विभागातील फाईली अनेकदा थेट संबंधित टेबलावरच जातात. काही फाईलींमध्ये त्रुटी नसतानाही मुद्दाम दाखवून पैसे घेतल्यानंतर त्या ‌‘ओके' केल्या जातात. असा नागरिकांचा आरोप आहे. आता प्रश्न असा निर्माण झाला आहे की, नूतन गटविकास अधिकारी या “टेबलराज”वर कारवाई करणार का? अनेक वर्षे एकाच ठिकाणी बसून कारभार करणाऱ्यांना बदलले जाणार का? की पुन्हा सर्व काही “जैसे थे” राहणार?

 
Top