धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या नावाने अनोळखी क्रमांकावरून नागरिकांना फसवणुकीचे संदेश पाठविले जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. +84568577358 या मोबाईल क्रमांकावरून नागरिकांना विविध प्रकारचे संदेश पाठविले जात असून, त्यात जिल्हाधिकाऱ्यांचे नाव गैरवापरून भ्रामक माहिती दिली जात असल्याचे लक्षात आले आहे.
या संदर्भात जिल्हाधिकारी पुजार यांनी संबंधित क्रमांक त्यांचा नाही तसेच त्यांनी अशा कोणत्याही प्रकारचे संदेश पाठविलेले नाहीत. नागरिकांनी या क्रमांकावरून येणाऱ्या संदेशांना प्रतिसाद देऊ नये, कोणतीही वैयक्तिक किंवा गोपनीय माहिती देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच हा क्रमांक तात्काळ ब्लॉक करून रिपोर्ट करण्याची सूचना त्यांनी नागरिकांना दिली आहे.
अशा प्रकारे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने संदेश पाठवून फसवणुकीचे प्रकार घडण्याच्या घटना अलीकडे वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून कोणत्याही अनोळखी नंबरवरील संदेशांची सत्यता तपासल्याशिवाय कृती करू नये, असे प्रशासनाने सांगितले आहे. जिल्हा प्रशासनाकडून या प्रकरणाची नोंद घेण्यात आली असून सायबर विभागालाही याबाबत कळविण्यात आले आहे. नागरिकांनी अशा फसवणूक करणाऱ्यांना संधी न देता प्रशासनास सहकार्य करावे. कोणतीही शंका असल्यास थेट जिल्हाधिकारी कार्यालयाशी किंवा पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. अशा फसवेगिरीच्या प्रकारांवर प्रशासन कठोर कारवाई करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.