धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्याचे मागासलेपण ओळखून केंद्र सरकारने जिल्ह्याचा समावेश आकांक्षीत जिल्हा म्हणून केला आहे.जिल्ह्यात यावर्षी सप्टेंबर महिन्यात आलेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेती पिकांचे, सार्वजनिक मालमत्तेचे व खाजगी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. जीवित व पशुहानी देखील झाली आहे.त्यामुळे जिल्ह्यातील विविध क्षेत्राच्या विकासासाठी विविध कंपन्या,कारखाने व बँकांनी पुढे यावे. असे आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले.
4 नोव्हेंबर रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी संमेलनात पुजार बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. पुजार पुढे म्हणाले की, जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. पूरग्रस्तांना अनेक सामाजिक संघटना, कंपन्यांनी,साखर कारखान्यांनी व बँकांनी विविध स्वरूपात मदत केली आहे. कॉर्पोरेट क्षेत्राने आपण कोणत्या क्षेत्रासाठी मदत करणार आहोत हे निश्चित करून कळवावे. असे पुजार म्हणाले. डॉ.घोष यांचेही भाषण झाले. यावेळी उपस्थित काही सीएसआर कंपन्यांच्या प्रतिनिधींनी आपण कोणत्या क्षेत्रासाठी काम करणार आहोत याची माहिती दिली तसेच काही प्रतिनिधींनी कंपनीशी चर्चा करुन कार्यक्षेत्र निवडणार असल्याचे सांगितले.
