धाराशिव (प्रतिनिधी)- शासकीय कामात अडथळा निर्माण करणे व वन विभागातील महिला वनसंरक्षक कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी दत्ता मोहन तुपे (रा. येडशी, ता. धाराशिव) यास धाराशिव येथील न्यायालयाने 5 वर्षांची सक्तमजुरी व 21 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. ही शिक्षा जिल्हा प्रमुख व सत्र न्यायाधीश ए. डी. देव यांनी सुनावली.
9 फेब्रुवारी 2023 रोजी फिर्यादी वनरक्षक यांनी यासंदर्भात ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. फिर्यादी व त्यांचे सहकारी शासकीय कामकाज करत असताना आरोपी तुपे यांनी त्यांना अडवून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला. चौकशीसाठी माहिती मागितल्यावर आरोपीने फिर्यादी महिला अधिकाऱ्याशी गैरवर्तन करत विनयभंग केला. या प्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा रजि. नं. 228/2023, कलम 353, 354, 352, 506 भादंवि अन्वये दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलिस निरीक्षक आर. एस. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पूर्ण करून न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
प्रकरणाच्या सुनावणीत जिल्हा सरकारी अभियोक्ता ॲड. महेंद्र देशमुख यांनी सरकारी पक्षाचा युक्तिवाद कोर्टासमोर मांडला. साक्षी पुराव्यांच्या आधारे आरोपी दोषी ठरल्यावर न्यायालयाने 5 वर्षांची सक्तमजुरी आणि 21 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. अतिशय प्रभावी युक्तिवाद आणि समोर आलेल्या पुराव्याच्या आधारे न्यायाधीश देव यांनी निकाल दिला.