उमरगा (प्रतिनिधी)- उमरगा तालुक्यातील कडदोरा रस्त्यावर अवैध गौण खनिज साठवणूक केल्याप्रकरणी गावकरी नरेंद्र पाटील यांचे दि. 4 नोव्हेंबरपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
समुद्राळ, कडदोरा शिव रस्त्यामार्गे सास्तुर, बलसुर रस्त्याला जोडणाऱ्या पूर्वेकडील भागात मोठ्या प्रमाणात अवैध गौण खनिज उत्खनन व साठवणूक करण्यात आले असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणात प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र माणिकराव पाटील यांनी दि. 31 ऑक्टोबर 2025 रोजी ठिय्या आंदोलन केले आहे.
पाटील यांनी सांगितले की, “या साठवणीविरोधात अनेक वेळा संबंधित महसूल विभागांकडे तक्रारी देण्यात आल्या. मात्र कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे गावातील पर्यावरणावर विपरित परिणाम होत असून, रस्त्यांची नासधूस होत आहे. ग्रामस्थांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. ”जर प्रशासन व संबंधित अधिकारी हे तात्काळ कारवाई करणार नसतील, तर दि. 4 नोव्हेंबर 2025 पासून अवैध खनिज साठवलेल्या ठिकाणीच बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा पाटील यांनी दिला आहे. प्रशासनाने अवैध गौण खनिज उत्खनन व साठा करणारे यांचेवर शासन परिपत्रकानुसार गुन्हे दाखल करून अवैध गौण खनिज अधिनियमानुसार दंड वसुल करावा. अशी मागणी ग्रामस्थांनी केली असुन ग्रामस्थांचाही आंदोलनास पाठींबा आहे.
