उमरगा (प्रतिनिधी)-  शेतकऱ्यांची कर्जमाफी हा कायम स्वरूपी उपाय नाही. शासनाने तीन वेळा शेतकरी कर्जमाफी करूनही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या नाहीत. शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव दिला पाहिजे. शेतकऱ्यांच्या शेतमाला करिता भावांतर योजना लागू करा . शेतकरी आर्थिक सक्षम झाला तरच शेतकरी आत्महत्या थांबतील. असे सांगून सरकारने 30 जून पर्यंत कर्ज माफी करण्याचे सांगितले असले तरी 30 जून पर्यंत आत्महत्या होणाऱ्या शेतकरी आत्महत्यांची जबाबदारी कोण स्वीकारणार असा सवाल शेतकरी नेते विनायकराव पाटील यांनी उपस्थित केला आहे.

माजी राज्यमंत्री बच्चू कडू आणि शेतकरी कर्जमाफी साठी अंदोलन उभे केले होते. या बाबत सरकारच्या वतीने शेतकऱ्यांच्या मूलभूत सुविधांचा अध्यादेश काढण्यात आला आहे. या बाबत माहिती देण्यासाठी उमरगा येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाटील बोलत होते. बच्चू कडू यांनी शेतकरी कर्ज माफीचे अंदोलन मागे कां घेण्यात आले असा सवाल करताना पाटील पुढे म्हणाले की,  शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. शेतकरी नेते आता तुम्हीच सांगा आता आम्ही शेतकऱ्यांनी कोणाचे हातपाय तोडायचे ? मागील सहा महिन्यांपासून शेतकरी कर्ज माफीसाठी बच्चू कडू, राजू शेट्टी सह आदि शेतकरी नेत्यांनी रास्ता रोको, ट्रॅक्टर मोर्चा इत्यादी विविध अंदोलने करूनही शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारने सोडविले नाहीत. अंदोलनकर्त्यांनी केवळ इव्हेंट करून प्रसिद्धी मिळविली.

सद्या शेतकरी पूर्णपणे उध्वस्त झाला आहे. शेतकऱ्यांच्या जीवावर राजकारण करू नका. स्वतः च्या राजकिय पक्षाची दुकानदारी चालविणाऱ्या शेतकरी नेत्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. रात्रीच्या अंधारात अंदोलन मागे घेण्यात आले. कर्जमाफी नाही झाली तर आमदारांचे हातपाय तोडा म्हणणाऱ्या शेतकरी नेत्या हो आता कोणी कोणाचे हातपाय तोडायचे ते सांगा. असा प्रश्न विनायक पाटील यांनी उपस्थित केला आहे. 


 
Top