धाराशिव (प्रतिनिधी)- संपूर्ण महाराष्ट्रभर 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर हा आठवडा पक्षी सप्ताह म्हणून साजरा केला जातो. या सप्ताहाचे आयोजन प्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली (12 नोव्हेंबर) आणि ज्येष्ठ पक्षी निरीक्षक मारुती चितमपल्ली (5 नोव्हेंबर) यांच्या जयंतीनिमित्त केले जाते. या पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयातील कला व वाणिज्य शाखेच्या वतीने पक्ष्यांसाठी 270 कृत्रिम घरटी बनवण्यात आली होती. आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य भैया पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सुधीर अण्णा पाटील, संस्थेच्या सरचिटणीस सौ प्रेमाताई पाटील यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना ही पक्ष्यांची घरटी मोफत वाटप करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये पक्ष्यांबद्दल जागरूकता वाढवणे आणि त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणे, लोकसहभाग वाढवणे या हेतूने हा अभिनव उपक्रम घेण्यात आला. यावेळी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील, प्राचार्य प्रा.नंदकुमार नन्नवरे, उपप्राचार्य प्रा. संतोष घार्गे, प्रा.डॉ.बालाजी कामठाणे, प्रा.डॉ. अजित मसलेकर, प्रा.डॉ. गोरख देशमाने, कला व वाणिज्य प्रमुख प्रा.कैलास कोरके, मनोज राजे निंबाळकर, श्रीकांत देशमुख, पर्यवेक्षिका सौ.भारती गुंड व ज्यांच्या संकल्पनेतून ही घरटी बनवली गेली ते मानद वन्यजीव रक्षक तथा पक्षी अभ्यासक प्रा.डॉ.मनोज डोलारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रा.डॉ.मनोज डोलारे यांनी पक्षी सप्ताहाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. कृत्रिम घरट्यांविषयीची माहिती सांगितली. आदित्य पाटील यांनी पक्ष्यांचे मानवी जीवनातील महत्त्व सांगून पक्षीसंवर्धन काळाची गरज असल्याचे सांगितले. तुम्हीही वापरात नसलेली खोकी, बाटल्या यांपासून घरटी बनवून या मुक्या जीवांच्या संवर्धनात मोलाचे योगदान देवू शकता, असे प्रतिपादन केले. तसेच प्रत्येक वाढदिवसाला दरवर्षी याच पध्दतीने किमान 500 घरटी मोफत वाटण्याचे आश्वासन दिले. प्राचार्य प्रा.नंदकुमार नन्नवरे यांनी विद्यार्थ्यांना पक्षीनिरीक्षण कसे करायचे? छंद कसा जोपासायचा? पक्षीनिरीक्षणातून आनंद कसा घ्यायचा याबाबत मार्गदर्शन केले. तर अध्यक्षीय भाषणात संस्थाध्यक्ष सुधीर आण्णा पाटील यांनी पक्षी हे पर्यावरणासाठी, शेतीसाठी कसे आणि किती उपयुक्त आहेत याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या अभिनव उपक्रमाचे कौतुक करत पक्षीसंवर्धनासाठी तरुणांनी, विद्यार्थ्यांनी पुढे आले पाहिजे असे आवाहनही केले.

या अभिनव उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.शितलकुमार ऐवळे, प्रा.राज भोसले, प्रा.यशवंत कोकाटे, प्रा.सिध्देश्वर जाधव, प्रा.प्रसाद माशाळकर, प्रा.दत्तात्रय जाधव, प्रा.डी.वाय.घोडके, प्रा.शंकर गोरे, प्रा.लक्ष्मण शिंदे,प्रा.राजहंस कांबळे, प्रा.अमित काकडे, प्रा.सविता जाधव, प्रा.सुवर्णा शेळके व शिक्षकेतर कर्मचारी पद्माकर ढेकणे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सूर्यकांत कापसे तर आभार उपप्राचार्य प्रा.संतोष घार्गे यांनी मानले.


 
Top