उमरगा (प्रतिनिधी)-  नगराध्यक्ष पदासाठी दाखल झालेल्या 17 अर्जापैकी 5 अर्ज नामंजूर तर 12 अर्ज मंजूर करण्यात आले. नगरसेवक पदासाठी दाखल झालेल्या 255 अर्जापैकी 128 अर्ज नामंजूर तर 127 अर्ज मंजूर झाले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी भाजपा, काँग्रेस, दोन्ही शिवसेना व दोन्ही राष्ट्रवादीचे उमेदवार उभे आहेत. महायुती व महाविकास आघाडीमध्ये नगराध्यक्ष पदावरुन एकमत न झाल्याने कालचे मित्र आज एकमेकांविरोधात शड्डु ठोकुन उभे आहेत. 

उमरगा नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी 17 तर नगरसेवक पदासाठी 255 अर्ज दाखल झाले होते. मंगळवारी (दि.18) झालेल्या छाननीत नगराध्यक्ष पदाचे हर्षवर्धन चालुक्य (भाजपा), किरण गायकवाड (शिवसेना), अमोल मोरे (काँग्रेस), अब्दुलरजाक अत्तार (शिवसेना उबाठा), विक्रम बिराजदार (राष्ट्रवादी काँग्रेस), संजय पवार (राष्ट्रवादी काँग्रेस, शप), प्रभाकर मजगे (वंचित बहुजण आघाडी) तसेच शाहूराज माने, नितीन होळे, रफिक अत्तार, शिवशंकर दंडगुले, शांतप्पा वरकले यांचे अपक्ष असे एकुण 12 अर्ज मंजूर झाले आहेत. तर कॉग्रेसचे महादेवप्पा पाटील व इमामजाफर औटी, भाजपाचे साईराज टाचले, शिवसेना (उबाठा) चे विजयकुमार नागणे यांचे एबी फॉर्म नसल्याने तर विक्रम बिराजदार (डबल अर्ज) यांचे एकुण 5 अर्ज नामंजूर झाले आहेत. तर नगरसेवक पदासाठी दाखल झालेल्या 255 अर्जापैकी 128 अर्ज नामंजूर तर 127 अर्ज मंजूर झाले आहेत. महायुती व महाविकास आघाडीमध्ये चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरु असुन उमेदवारी अर्ज मागे घेण्याची 21 नोव्हेंबर मुदत असल्याने तेंव्हाच चित्र स्पष्ट होणार आहे. 2 डिसेंबरला मतदान होणार असून 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी असुन ते थेट जनतेतुन नगराध्यक्ष निवडला जाणार आहे. त्यामुळे 11 प्रभागात नगराध्यक्षासह तीन तर 12 व्या प्रभागात नगराध्यक्षासह चार मते देता येणार आहेत. शहरातील 12 प्रभागातुन 25 नगरसेवक निवडले जाणार आहेत. या निवडणुकीत 31 हजार 791 मतदार आपला हक्क बजावणार आहेत. यामध्ये पुरुष मतदार 16 हजार 231 तर महिला मतदारांची संख्या 15 हजार 555 तर इतर 5 मतदारांचा समावेश आहे. नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्षाचे हर्षवर्धन चालुक्य, शिवसेना (शिंदे) चे किरण गायकवाड, कॉग्रेसचे अमोल मोरे, शिवसेना (ठाकरे) चे रझाक अत्तार, राष्ट्रवादी काँग्रेस (अप) चे विक्रम बिराजदार, राष्ट्रवादी काँग्रेस(शप) चे संजय पवार, वंचित बहुजण आघाडीचे प्रभाकर मजगे व अपक्ष असे उमेदवार रिंगणात आहेत.

 
Top