धाराशिव (प्रतिनिधी)- श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.मनोज डोलारे यांना त्यांच्या पर्यावरणीय, सामाजिक व शैक्षणिक कार्याबद्दल आनंदी युनिव्हर्सल फाउंडेशन, पुणे कडून महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2025 देऊन सन्मानित करण्यात आले.

इकॉनॉमिक्स टाईमचे संपादक डॉ.अविनाश सकुंडे, बालगंधर्व कला मंच पुणेचे अध्यक्ष पै.निलेंद्र यादव, मराठी सिनेअभिनेत्री फाल्गुनी झेंडे यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रा.डॉ.मनोज डोलारे यांना प्रदान करण्यात आला.

पुणे येथील शिवाजीनगरमधील पंडित जवाहरलाल नेहरु सभागृहात हा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. सोहळ्यास आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटनेचे राकेश पावरा, मराठी सिनेअभिनेत्री सोनाली कनखरे व आनंदी युनिव्हर्सल फाउंडेशनचे संस्थापक गणेश विटकर, उद्योजक, समाजसेवक, कलावंत आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

प्रा.डॉ.डोलारे मागील 15 वर्षापासून मराठी अध्यापनाचे कार्य करत आहेत. विद्यादानासोबतच पर्यावरणीय तसेच सामाजिक क्षेत्रात अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवीत त्यांनी सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. वनविभागाचे मानद वन्यजीव रक्षक, जिल्हा पर्यावरण समितीचे सदस्य, बी.एन.एच.एस.चे जिल्हा समन्वयक अशा महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतील विविध पदांवर कार्यरत आहेत. विशेष म्हणजे पक्षीसंवर्धनातील त्यांनी केलेले कार्य हे कौतुकास्पद आहे. पक्षीमित्र, पक्षी अभ्यासक तसेच वन्यजीव छायाचित्रकार म्हणून ते जनमानसात परिचित आहेत.

 वृक्षारोपण व संवर्धन, पक्षांसाठी कृत्रिम घरटे बनवणे, त्यांना दाण्यापाण्याची सोय करणे, पक्षी गणना करून त्यांचा अभ्यास करणे, विद्यार्थ्यांमध्ये, जनमानसात पर्यावरण तसेच पक्षांचे महत्त्व बिंबवणे यासाठी कार्यशाळा घेणे. विद्यार्थ्यांना रानफुले, फुलपाखरे, पक्षी, वन्यजीव, वनस्पती यांच्या प्रत्यक्ष निरीक्षणातून निसर्गाच्या जवळ नेण्यासाठी नेचर वॉक, ट्रेकिंग, अभ्यास भ्रमंती यांचे सतत आयोजन ते करत असतात.  तसेच त्यांच्या एक्स-ट्रीम फिटनेस क्लब या व्यायाम शाळेच्या माध्यमातून युवकांची शरीरे घडावीत, आहार व व्यायाम याबाबतीत जनसामान्यांमध्ये जागृती व्हावी म्हणून यासाठी ते प्रयत्नशील आहेत. 

 सामाजिक बांधिलकी जपत असतानाच महाराणी अहिल्यादेवी होळकर समाज प्रबोधन मंच महाराष्ट्र राज्य, श्री शिवशंभू प्रतिष्ठानच्या माध्यमातून गरजू व ग्रामीण भागातील लोकांसाठी मोफत सर्व रोग निदान शिबिरे, युवकांसाठी विविध विषयावर मार्गदर्शन वर्ग, विधवा तसेच गरजू महिलांसाठी शिलाई मशिन, शेळी वाटप, रक्तदान शिबिरे, व्याख्यानमाला असे विविध उपक्रम ते आयोजित करत आहे. जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तू, ठेवा यांच्याबद्दल जाणीव जागृती व्हावी म्हणून दरवर्षी ऐतिहासिक वास्तूंना विद्यार्थ्यांसह ते भेटी देतात.

या सर्व पर्यावरणीय, सामाजिक तसेच शैक्षणिक कार्याची दखल घेत महाराष्ट्र गौरव पुरस्कारासाठी आनंदी युनिव्हर्सल फाउंडेशनने त्यांची निवड करुन त्यांना सन्मानित केले. प्रा.डोलारे यांना मिळालेल्या पुरस्काराचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 
Top