तुळजापूर (प्रतिनिधी)-  तीर्थक्षेत्र तुळजापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी सुटल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे. यामुळे आता पुन्हा एकदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडीची चुरशीची लढत रंगणार असल्याचे संकेत मिळत आहेत. खुल्या प्रवर्गाला जागा सुटताच काही इच्छुक व समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला.

तुळजापूर नगरपरिषदेची मुदत 29 डिसेंबर 2021 रोजी संपल्यानंतर मागील तीन वर्षांपासून प्रशासक यांच्या हाती नगरपरिषदेचा कारभार आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या अंतिम प्रभाग रचनेनुसार 11 प्रभागांतून 23 नगरसेवक निवडून येणार आहेत. 2006 पासून नगराध्यक्ष पदावर महिलांचे वर्चस्व राहिले आहे. संगीता कदम, अर्चना गंगणे, मंजुषा मगर, भारती गंगणे व विद्याभाभी गंगणे यांनी नगराध्यक्षपद भूषवले आहे. 2025 मध्ये प्रथमच पुन्हा पुरुष उमेदवारांना संधी मिळणार असून, खुल्या  प्रवर्गाच्या आरक्षणामुळे चुरस तीव्र होण्याची शक्यता आहे.


पुजारी मतदारसंख्या ठरणार निर्णायक

तुळजापूर तीर्थक्षेत्रात पुजारी  मतदारसंख्या लक्षणीय असल्याने या निवडणुकीत प्रत्येक पक्षाची रणनीती काटेकोर राहणार आहे. इच्छुकांची संख्या वाढत असून, गटबाजी आणि पक्षीय समीकरणे निवडणुकीची दिशा ठरवणार आहेत.“तीर्थक्षेत्र तुळजापूरचा विकास आणि नगरपरिषदेची ओळख नव्या नगराध्यक्षाच्या कामगिरीवर अवलंबून असेल,” असा सूर नागरिकांमध्ये ऐकू येत आहे. तुळजापूरच्या नगराध्यक्षपदासाठी भैय्यांमध्ये रंगणार भव्य सामना रंगेल अशी चर्चा होत आहे.

 
Top