तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील काक्रंबा गावात अपंग मजुरावर जीव घेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात अण्णा हनुमंत देवगुंडे (वय 40, रा. काक्रंबा, ता. तुळजापूर) गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर जिल्हा रुग्णालय, धाराशिव येथे उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 4 ऑक्टोबर 2025 रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास अण्णा देवगुंडे हे काक्रंबा बसस्टॉपजवळील अनिल ठवरे यांच्या चहाच्या हॉटेलसमोर काही परिचितांसोबत बोलत बसलेले असताना, त्याच गावातील शुभम उर्फ दादा कुमार देवकते आणि कुमार कोंडीबा देवकते हे दोघे तेथे आले.
शुभम याच्या हातात लोखंडी कत्ती होती. त्याने “या लंगड्याला जिवंत ठेवायचं नाही“ असे म्हणत देवगुंडे यांच्यावर हल्ला केला. कत्तीचा वार अण्णा यांनी हाताने अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या डाव्या हातावर व उजव्या हातावर गंभीर जखमा झाल्या. त्यानंतर कुमार देवकते याने शुभमकडील कत्ती हिसकावून घेत देवगुंडे यांच्या पायावर व पाठीवर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. घटनास्थळी उपस्थित सचिन खताळ, प्रकाश झाडे, कालिदास खताळ यांनी आरडाओरड करून भांडण सोडवले. मात्र, आरोपींनी “तू जिवंत राहिलास तर तुला संपवू“ अशी धमकी देत शिवीगाळ करून पलायन केले.
जखमी देवगुंडे यांना प्रथम तुळजापूर येथील सरकारी दवाखान्यात नेण्यात आले व त्यानंतर उपचारासाठी धाराशिव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. देवगुंडे यांनी दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी शुभम उर्फ दादा कुमार देवकते व कुमार कोंडीबा देवकते (दोघे रा. काक्रंबा, ता. तुळजापूर) यांच्याविरुद्ध जीवघेणा हल्ला, मारहाण, धमकी व जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा नोंदविला असून पुढील तपास तुळजापूर पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.