वाशी (प्रतिनिधी)- वाशी तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पूरपरिस्थितीने जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेक शेतकऱ्यांची पिके वाहून गेली, शेतीची सुपीक माती नष्ट झाली. तसेच अनेक कुटुंबांचे घरसुद्धा पडझडीत उद्ध्वस्त झाले. या संकट काळात पूरग्रस्त आणि एकल महिलांना दिलासा देण्यासाठी वंचित विकास संस्था आणि जाणीव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने मदत उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमाअंतर्गत वाशी तालुक्यातील पूरग्रस्त आणि शेतकरी एकल महिलांना किराणा मालाच्या किटचे वाटप करण्यात आले. वंचित विकास संस्थेच्या संचालिका व कार्यवाह मीनाताई कुर्लेकर यांच्या पुढाकाराने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ही सामाजिक बांधिलकी जोपासणारी मदत कार्यवाही पार पडली. किराणा किटचे वितरण जाणीव संघटना कार्यालय, वाशी येथे करण्यात आले. या माध्यमातून वाशी, दसमेगाव, सारोळा, मांडवा, पिंपळगाव, लिंगी, गोजवाडा, बावी, सोनारवाडी, तांदुळवाडी, सरमकुंडी, शेंडी आणि कन्हेरी या गावांतील लाभार्थ्यांना मदतीचा हात देण्यात आला. या प्रसंगी वंचित विकास संस्थेचे कार्यकर्ते रामभाऊ लगाडे, शहाजी चेडे, रत्नदीप गाडे, राजू डोईफोडे, वैशाली शिरसागर, सीमा यादव, मधुकर गायकवाड, अंजली गायकवाड आणि अरुण उंद्रे यांची उपस्थिती होती.