धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचबरोबर शेतरस्ते देखील वाहून गेलेले आहेत. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी शिवसेनेचे धाराशिव जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी राज्याचे रोजगार हमी योजना, फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले यांची प्रत्यक्ष भेट घेवून निवेदनाद्वारे केली आहे.

रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले यांची शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी भेट घेवून धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत सविस्तर चर्चा केली. विशेष म्हणजे नदीकाठच्या गावाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतातील पिकांबरोबर शेतातील मातीही खरवडून वाहून गेली. पशुधनासाठी साठवलेला चाराही वाहून गेला असून अनेक पशुपालकांची जनावरेही पुरात वाहून गेली. तर शेतरस्ते देखील वाहून गेले आहेत. ऐन दिवाळी आणि रब्बी हंगामाच्या तोंडावर अशा गंभीर संकटाला शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे मंत्री महोदयांना अवगत करण्यात आले. शासनाकडून शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आलेली असली तरी शेतरस्त्यांच्या दुरुस्तीसाठी देखील निधी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी केली. त्यावर मंत्री भरतशेठ गोगावले यांनी सदरील वाहून गेले शेत रस्ते नव्याने करण्यासाठी निधी देण्याचा शब्द दिला असल्याची माहिती जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी दिली. यावेळी शिवसेनेचे धाराशिव जिल्ह्यातील इतर पदाधिकारी उपस्थित होते.


 
Top