धाराशिव (प्रतिनिधी)- एकलव्य विद्या संकुल मंगरूळ येथे प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. प्रथम सत्रातील हा मेळावा 135 पालकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. 

कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने झाली. मेळाव्यासाठी संस्थेचे पदाधिकारी तसेच जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांताचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अण्णासाहेब कोल्हटकर यांनी केले. यावेळी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 25 विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांना पुस्तक भेट देण्यात आली. जिल्हा संघचालक ॲड. रवींद्र कदम यांनी पालकांना मार्गदर्शन केले. तर मुख्याध्यापक म्हेत्रे सर यांनी शालेय उपक्रम व शिस्तीबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या. या मेळाव्यात भटके विमुक्त समाजातील पदवी पूर्ण करून पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी शिष्यवृत्ती योजनेचा शुभारंभ करण्यात आला. जनकल्याण समितीच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने दरवर्षी भटके विमुक्त समाजातील शेवटच्या 10 मागास जमातींपैकी दोन विद्यार्थिनींना प्रत्येकी एक लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येते. यंदा या योजनेअंतर्गत जळगाव आणि पिंपरी चिंचवड येथील दोन युवतींना ही शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. या योजनेचा उद्देश परागजी कंगले यांनी पालकांसमोर स्पष्ट केला. कार्यक्रमाचा समारोप भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ. अभय शहापूरकर यांनी केला. आभारप्रदर्शन अण्णासाहेब मगर यांनी केले, तर सूत्रसंचालन अनिल घुगे यांनी केले.

 
Top