धाराशिव (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र तुळजापूरच्या शिरपेचात 108 फूट उंच शिवभवानी शिल्पामुळे आणखी मानाचा तुरा खोवला जाणार आहे. हे शिल्प आध्यात्मिक, ऐतिहासिक आणि धार्मिक अंगाने परिपूर्ण असावे यासाठी या क्षेत्रातील तज्ञ मान्यवरांकडून प्रतिकृतींचे आणखी बारकावे तपासले जाणार आहेत. राज्याच्या कला संचालनालयाकडे सादर करण्यात आलेल्या एकूण 14 प्रतिकृतींपैकी पाच प्रतिकृतींची निवड करण्यात आली आहे. धार्मिक आणि प्राचीन इतिहास क्षेत्रातील तज्ञांकडून केल्या जाणाऱ्या सूचनांप्रमाणे पुन्हा नव्याने निवड करण्यात आलेल्या शिल्पकारांना दुरुस्तीसह प्रतिकृती सादर करण्यासाठी एक महिन्याचा अवधी देण्यात येणार आहे. आपण स्वतः शनिवारी कला संचालनालयाल भेट दिली. प्रचंड ऊर्जेचे स्रोत असलेल्या छत्रपती शिवरायांना आशीर्वाद देत असलेल्या तुळजाभवानी मातेच्या शिल्प प्रतिकृतीचे मनोभावे दर्शन घेतल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे साकारण्यात येणाऱ्या 108 फूट उंच शिवभवानी शिल्पासाठी पाच प्रतिकृतींची निवड राज्याच्या कला संचालनालयामार्फत करण्यात आली आहे. प्राप्त झालेल्या एकूण 14 प्रतिकृतींपैकी निवडण्यात आलेल्या या पाच शिल्प प्रतिकृतींची पाहणी पुन्हा एकदा तज्ज्ञांच्या समितीकडून केली जाणार आहे. त्यातील अध्यात्मिक, धार्मिक आणि ऐतिहासिक बारकावे तपासल्यानंतरच कुलस्वामिनी तुळजाभवानी माता छत्रपती शिवरायांना आशीर्वाद देत असतानाचे 108 फूट उंचीचे भव्य शिल्प अंतिम केले जाणार आहे. शिल्पकला, प्राचीन इतिहास संशोधन, धार्मिक आदी क्षेत्रातील तज्ञ मान्यवरांच्या या समितीत सहभाग असणार आहे. निवडण्यात आलेल्या प्रतिकृतींची अत्यंत बारकाईने पाहणी केल्यानंतर तज्ञांच्या या समितीकडून आवश्यकतेनुसार काही सूचना आणि फेरबदल सुचविले जातील. आणि त्यानंतर या पाचही शिल्पकारांना सुचविण्यात आलेले फेरबदल आणि सूचना यानुसार पुन्हा एकदा शिवभवानी शिल्पाची प्रतिकृती सादर करण्यासाठी एक महिन्याचा वाढीव वेळ देण्यात येणार आहे. त्यानंतर प्राप्त होणाऱ्या पाचपैकी एक प्रतिकृती अंतिम केली जाणार असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.